
ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच जंतरमंतरवर लाठ्या काठ्या खाल्लेल्या जेन झीसोबत मोहन भागवतांनी संवाद साधावा असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, अत्यंत योग्य आणि धारदार पद्धतीने शिवसेनेचे वकील, कायदेपंडित डॉ. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. विधीमंडळातला पक्ष किंवा आमदारांचा गट फुटला म्हणून मूळ पक्ष फुटला किंवा फूट पडली असं मानता येत नाही. हे त्यांनी मुख्य न्यायाधीशाच्या खंडपीठाला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्या घटनापीठासमोर उभा राहून मी ऐकत होतो. न्यायालयाच्या मनात अनेक शंका होत्या, त्याचे निरसन आमच्या वकिलांकडून करून घेतलं. अशा प्रकारे एका चिन्हावर निवडून आलेले लोकं कोणत्याही कायद्याचे बंधन न पाळता दुसऱ्या पक्षात जाऊन सत्तेत घुसू लागले तर या देशातली लोकशाही आणि संविधानाला अर्थ राहणार नाही. आणि म्हणून न्यायालयाने पुढाकार घेऊन यांच्यावर कायद्याची बंधन घातली पाहिजे. शिवसेना हा पक्ष अजिबात फुटलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधीमंडळ पक्षात नक्कीच फुट पडली. काही आमिषापोटी आणि काही लोभापोटी. आणि म्हणूनच पक्ष फुटला नसून मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेकडेच रहायला हवं किंवा राहिल अशा पद्धतीने बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न विचारले. शिवसेनेच्या घटनेविषयी, रचनेविषयी आणि त्यांचे पूर्ण समाधान आमच्याकडून करण्याचा प्रयत्न झाला. हा एक ऐतिहासिक खटला देशाच्या लोकशाहीसंदर्भात सुरू आहे. देशातल्या संविधानाबाबत सुरू आहे याची जाणीवसुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण करताना जाणवलं. या खटल्यातल्या निर्णयामुळे देशातल्या लोकशाहीवर दूरगामी परिणाम होणार आहे. हे सुद्धा मुख्य न्यायाधीश सुर्य कांत आणि त्यांचे सहकारी मोहना आणि बागची याच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कायदा आणि संविधान त्याचे काम करेल. ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे संजय राऊत म्हणाले.
माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आहे. आणि भाजपमध्ये विलीन व्हायचं. प्रहार सारखा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला होता, त्यासंदर्भात त्यांच्यात खल सुरू आहे. आता लवकरच फुटीर गटाचे नेते दिल्लीत येतील आणि अमित शहांसोबत चर्चा करतील. पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दबावाखाली दिलेला चुकीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला, तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय होईल. वारंवार फुटीर गटाचे नेते शिंदे म्हणत होते की आमच्या पाठीशी महाशक्ती आहे. त्यामुळे आमचं कुणी वाकडं करू शकत नाही, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलेले आहे. एकाचवेळी सगळे सूरतला जाणं, सूरतवरून गुवाहाटी आणि तिथून गोव्याला जाणं हा योगायोग नाही. हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
2014 आणि 2019 च्या निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच झाल्या, आणि त्या नेतृत्वाखाली झालेल्या सरकारमध्येही हा फुटीर गट सामील होता. त्यामुळे राजकीय वैचारिक फूट आहे असं मानता येणार नाही. 2014 साली आम्ही स्वतंत्रपणे लढून भारतीय जनता पक्षासोबत युती केली. तेव्हा यांचा वैचारिक लढा कुठे गेला होता, अशा अनेक गोष्टी रेकॉर्डवर आल्या आहेत.
आता आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे. काल कपिल सिब्बल यांना कोर्टाने अडीच तासांचा वेळ दिला होता. एवढ्या काळात आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आजही दोन वाजता सुनावणी होईल आणि कपिल सिब्बल यांचं म्हणणं पूर्ण होईल. मग समोरच्या वकिलांकडून बाजू ऐकली जाईल आणि आज मला निर्णय अपेक्षित आहे.
2024 च्या निवडणुकीत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. लाडक्या बहिणींना दीड हजार देऊन मतं विकत घेतली. आता 92 लाख महिला अपात्र ठरल्या आता सगळ्यांचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे.
मोपलवार हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते. समृद्धी महामार्गाला त्यांचेच नाव द्यायला पाहिजे होते. एक मोठं कंत्राट जर त्यांना मिळत असेल तर ही बाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळाली पाहिजे. जर तुम्हाला याबाबतीत काही चुकीचे वाटत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना हा प्रश्न विचारावा लागेल. समृद्धी महामार्गामध्ये आणि शक्तीपीठ महामार्गात हजारो कोटींचा घोटाळा झालेला आहे, कंत्राटदारांकडून काम होण्यापूर्वीच 25 ते 30 कोटी कमिशन घेण्यात आलेले आहे. आणि या हजारो कोटी रुपयांमधून आमदार खासदार विकत घेतले गेले हे सगळ्यांना माहित आहे. अशा कामातून अनेक अधिकारी, कंत्राटदार, राजकारणी इतके फुगलेले आहेत की बेडकाचा बैल झालेला आहे. यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सचोटीने उत्तर दिले पाहिजे.
सरसंघचालक मोहन भागवत हे आज जेन झीसोबत संवाद साधणार आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, ही सगळी मुलं संघ आणि भाजपच्या नेत्यांची मुलं आणि नातवंड आहेत. ज्यांनी सरकारविरोधात आक्रोश केला त्यांना मी जेन झी मानतो, आणि आजही मोदींनी माफीचे नाटक करूनसुद्धा अमित शहांचे पोलीस आणि त्यांची यंत्रणा त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना दमबाजी करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. त्यातलीच एक मुलगी रिया अहिर राहुल गांधींना भेटली. मोहनराव भागवतांनी या मुलांशी बोललं पाहिजे. आपल्याच पदाधिकाऱ्यांच्या नातवंडांशी बोलून काय साध्य होणार आहे? हे चुकीचे आहे. जंतरमंतरवर ज्या मुलांनी लाठ्या खाल्ल्या, पेलट गनचे हल्ले छातीवर झेलले त्यांची मोहन भागवतांनी भेट घ्यावी, असे संजय राऊत म्हणाले.
आम्ही बोलतोय म्हणून ही लोकशाही आणि संविधान जिवंत आहे, आम्ही बोलतोय म्हणून या देशामध्ये जाग आहे. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करतोय म्हणून लोकांना आशा आहे. आम्ही सुद्धा तोंड शिवून गप्प बसलो असतो तर हा देश इदी अमीनच्या ताब्यात गेला असता जो आता मला जाताना दिसतोय तो आम्ही थांबवला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
जनतेच्या प्रश्नावर राहुल गांधी कधीही मौन राहणार नाहीत. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार आहे. तिथेही आंदोलन सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांची पहिली जबाबदारी आहे. नेहा बोरा तिथे पोहोचली आहे, आणखी लोक तिथे जातील आणि गरज पडली तर आम्हीही तिथे जाऊ, असेही संजय राऊत यांनी नमूद केले आहे.





























































