अमित शहा सभागृहात या! विरोधकांनी सरकारला घेरले; लोकसभेतील कोंडी कायम, कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
opposition-demands-amit-shah-presence-in-lok-sabha-over-student-protests-adjourned

देशभरात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची कोंडी झाली आहे. गुरुवारी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

कामकाजाच्या सुरुवातीला हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सभागृहात त्या हल्ल्यांतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण केली.

त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी 20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरू केली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उपस्थित राहावे, अशी मागणी केली. काही सदस्यांच्या हातात फलकही दिसून आले. गदारोळ सुरूच राहिल्यानंतर ओम बिर्ला यांनी सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उपस्थित राहावे अशी मागणी लावून धरली. गदारोळ कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आतापर्यंत लोकसभेने सहा विधेयके मंजूर केली आहेत.

यापैकी सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026, राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2026, जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, 2026 आणि सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक, 2026 या चार विधेयकांना राज्यसभेचीही मंजुरी मिळाली आहे.