
अयोध्येतील राम मंदिरात झालेली कथित चोरी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे रामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक साध्वी ऋतंभरा यांनी म्हटले आहे. तसेच दोषींवर त्वरीत कारवाई करण्याची मागणीही ऋतंभरा यांनी केली आहे. इंदूरमध्ये मीडियाशी संवाद साधताना साध्वी ऋतंभरा यांनी राम मंदिरातील कथित चोरीबाबत प्रतिक्रिया दिली.
हे मंदिर उभारण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यामुळे या कथित चोरीमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. भक्तीभावाने या मंदिरात अर्पण केलेल्या पैशांवर गिधाडासारखी नजर टाकणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे साध्वी ऋतंभरा पुढे म्हणाल्या. या कथित चोरीस जबाबदार असलेल्यांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ऋतंभरा यांनी केली. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून लोकांमध्ये मूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे, असेही ऋतंभरा यांनी सांगितले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला कारणीभूत ठरलेल्या ‘जेन झी’ (Gen Z) चळवळीबद्दल साध्वी ऋतंभरा यांनी आपले मत मांडले आहे. देशाचा वर्तमान आणि भविष्य तरुण पिढीच्या हातात आहे; तरुणांनी स्वतःला देश आणि परंपरांसाठी समर्पित केले पाहिजे आणि आपल्या क्षमतांचा शहाणपणाने वापर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थानातील तरुणांनी सन्मानपूर्वक जीवन जगावे अशी आमची अपेक्षा आहे. तेच देशाची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करतील. मी अनेकदा म्हणते की, आपली हिंदुस्थानी मुले ही तुळशीच्या रोपट्यांसारखी आहेत; त्यांना वासनेच्या मद्याने नाही, तर मूल्यांच्या गंगाजलाने सिंचले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.






























































