
महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि वाहन खरेदीवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावरून महानगरपालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला. महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा या मुद्दय़ावरून चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले की, एका आमदाराला संपूर्ण मतदारसंघासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो, तर महापौरांच्या बंगल्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्याशिवाय दीड ते दोन कोटी रुपयांच्या गाडय़ा घेतल्या जात आहेत. हा सर्व खर्च स्वतःवर कशासाठी? महापौर बंगला पर्यटनस्थळ करायचा आहे का? त्यापेक्षा मुंबईतील स्वच्छता, कचरा, रस्ते आणि बेस्ट अशा मूलभूत सुविधांकडे लक्ष द्या.’
गाडय़ांसाठी पैसे आहेत, पण चौपाटी स्वच्छ करायला नाहीत
गाडय़ा खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, मग चौपाटी स्वच्छ करण्यासाठी महापौरांकडे पैसे नाहीत का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईत सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत, बेस्टच्या बस कमी होत आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वेळेवर मिळत नाहीत, काँक्रीटीकरणानंतरही रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. मात्र महापौर बंगल्यासाठी आणि नव्या गाडय़ांसाठी निधी सहज उपलब्ध होतो, अशी टीकाही त्यांनी केली.
आधी चंदाचोरीपासून सुरुवात करा
सिद्धिविनायक मंदिरातील गैरव्यवहाराबाबतही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. चोरीप्रकरणी पकडलेले लोक शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे, मग आधी चंदाचोरीपासून सुरुवात करा. वाराणसीसह इतर मंदिरांमध्ये काय घडले याचाही आढावा घ्या, असे ते म्हणाले. कोणाचे किती फ्लॅट आहेत, कुठे आहेत, कोणाकडे किती चाव्या आहेत याची माहिती आमच्याकडे आहे, गरज पडल्यास ती जाहीर करू, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर आरोप करणारे शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्यावरही निशाणा साधला.
शिंदेंचे खिसे भरले, पण मुंबईतले खड्डे नाहीत
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांवरही बोट ठेवले. दोन वर्षांत मुंबईचे रस्ते चकाचक होतील, असे एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात चार वर्षांपूर्वी सांगितले होते. शिंदेचे खिसे भरले, पण रस्त्यांवरील खड्डे अद्याप भरले गेलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.






























































