ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांना गणेशोत्सवापूर्वी नवीन घराच्या चाव्या, पहिल्या टप्प्यात 557 सदनिकांचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश दराडे, मुंबई

वरळी आणि नायगावपाठोपाठ ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडीवासीयांचे प्रशस्त घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. गणेशोत्सवापूर्वी ना. म. जोशी मार्ग येथील 557 पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्याची म्हाडाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या रहिवाशांचे अलिशान टू बीएचके घरामध्ये राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महाविकास आघाडीच्या काळात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू झाले असून म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन कामाचा आढावा घेतात. ना. म. जोशी मार्ग येथील 32 चाळींमधील 2560 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 23 मजल्यांचे 14 टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील ई, एफ, जी विंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यापैकी दोन विंगमधील 557 सदनिकांचे वितरण सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱयाने दिली.

वरळीतील 574 जणांना महिनाअखेर घराचा ताबा

वरळी बीडीडीतील आणखी 574 रहिवाशांना या महिन्याच्या अखेरीस घराचा ताबा देण्यात येणार आहे. यात पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील बी आणि सी विंगमधील सदनिकांचा समावेश आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये आणखी 271 रहिवाशांना घरांचे वितरण करण्यात येणार आहे.