कलियुगातील भीषण वास्तव! बाप वृद्धाश्रमात मरून पडला, शिक्षक मुलीने 5100 रुपये भरत अंत्यसंस्कार ऑनलाइन बघितले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील सोनीपत येथील ही घटना आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या तीन मुलींना शिकवून स्वावलंबी बनवणाऱ्या एका पित्याला उतारवयात वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागला आणि अखेरच्या वेळी मुलींनी प्रत्यक्षात येण्याऐवजी व्हिडीओ कॉलवरूनच वडिलांचे अंत्यदर्शन घेतले.

कापड व्यावसायिक शिवचरण रतन गुप्ता असे त्यांचे नाव असून ते दीर्घकाळापासून आजारी होते आणि त्यांना आयुष्याच्या शेवटी आपल्या मुलींना एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिन्ही मुलींपैकी कोणतीही मुलगी वृद्धाश्रमात पोहोचली नाही. मुलींनी अंत्यसंस्कारासाठी 5 हजार 100 रुपये ऑनलाईन पाठवून दिले आणि वडिलांच्या अंत्यविधीचा व्हिडिओ मोबाईलवर पाठवण्याची विनंती केली. वृद्धाश्रमाचे प्रशासक आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचे आयुष्य वेचले होते. त्यांच्यापैकी दोघी जणी पुढे शिक्षिका झाल्या आणि आपल्या मुलींच्या यशाचा वृद्ध पित्याला मोठा अभिमान होता. वडिलांनी स्वतःचे आयुष्य मुलींच्या भविष्यासाठी वाहून घेतले. पण त्याच पित्याला अखेरच्या निरोपाच्या वेळी एकाकी राहावे लागले.

पैसे मिळाल्यानंतर वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन शिवचरण रतन गुप्ता यांच्यावर  सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार आणि अस्थीविसर्जनाचे विधि पार पाडले. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडियावर मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अद्याप या प्रकरणावर मुलींकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.