खात्यातून पैसे कट झाले मात्र एटीएममधून रोकड आलीच नाही, ग्राहकाला 15 हजाराची नुकसान भरपाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या ग्राहकाच्या खात्यातून 10 हजार रुपये कट झाले. मात्र एटीएममधून रोख रक्कम आलीच नाही. याप्रकरणी सेवेतील त्रुटीसाठी बँकेला जबाबदार धरत ग्राहकाला 15 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. केरळमधील जिल्हा ग्राहक आयोगाने हा निर्णय दिला.

केरळमधील एका जिल्हा ग्राहक आयोगाने ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ला सेवेतील त्रुटीसाठी जबाबदार धरले. एका ग्राहकाच्या खात्यातून 10 हजार रुपये कट होऊनही एटीएममधून रोख रक्कम न मिळाल्यामुळे हा निर्णय देण्यात आला. ग्राहकाच्या तक्रारींचे योग्य प्रकारे निवारण करण्यात बँक अपयशी ठरली आणि प्रत्यक्षात रोख रक्कम काढली गेली होती हे सिद्ध करू शकली नाही, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले. यामुळे, आयोगाने बँकेला वजा केलेली रक्कम परत करण्याचे आणि मानसिक त्रास व गैरसोयीबद्दल 5000 रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.

तक्रारदार पी. के. साथियन यांनी 28 जुलै 2022 रोजी कोझिकोडमधील कलाई रोडवरील युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांच्या बचत खात्यातून 10 हजार रुपये काढायचे होते. त्यांच्या खात्यातून रक्कम वजा झाली असली, तरी एटीएममधून कोणतीही रोख रक्कम बाहेर आली नाही.

साथियन यांनी या अयशस्वी व्यवहाराबद्दल त्वरित बँकेला कळवले. त्यांनी सर्वप्रथम 30 जुलै 2022 रोजी बँकेच्या चेरुट्टी रोड शाखेत लेखी तक्रार दाखल केली. मात्र रक्कम खात्यात परत जमा झाली नाही, तेव्हा त्यांनी 12 ऑगस्ट 2022 रोजी कलाई रोड शाखेत पुन्हा तक्रार केली. वारंवार विनंती करूनही बँकेने ना पैसे परत केले ना समस्येचे निवारण केले, ज्यामुळे त्यांना ग्राहक आयोगाकडे दाद मागावी लागली.

सेवेतील त्रुटीमुळे बँकेला जबाबदार धरत आयोगाने तक्रारदाराच्या खात्यातून वजा केलेली 10,000 रुपयांची रक्कम परत करण्याचे आणि नुकसानभरपाई म्हणून 5,000 रुपये 30 दिवसांच्या आत देण्याचे निर्देश दिले. तसेच, विहित मुदतीत रक्कम परत न केल्यास, ती रक्कम परत करेपर्यंत त्यावर 9 टक्के वार्षिक दराने व्याज द्यावे लागेल, असेही आयोगाने स्पष्ट केले.