पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सबमर्सिबल पंप बसवण्यासाठी खोदलेला खड्डा उघडाच सोडल्याने हा अपघात घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ही घटना बुधवारी सायंकाळी जौनपूर जिल्ह्यातील बरसाठी परिसरातील गरोपूर गावात घडली. उपविभागीय अधिकारी (मडियाहू) नवीन कुमार यांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी अछेलाल उर्फ पप्पू गौतम यांनी सबमर्सिबल पंप बसवण्यासाठी मंगळवारी बोअरवेलचे काम सुरू केले होते. यासाठी खोदलेला खड्डा झाकून ठेवण्यात आला नव्हता. त्यानंतर झालेल्या पावसामुळे त्या खड्ड्यात पाणी साचले.

बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता विरेंद्र बिंद यांचा सहा वर्षांचा मुलगा शिवम बिंद आणि अनिल बिंद यांचा पाच वर्षांचा मुलगा आरव बिंद हे खेळत असताना त्या परिसरातून जात होते. त्यावेळी दोघेही पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडले.

मुले बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर त्यांच्या घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या त्या खड्ड्यात दोघेही आढळून आले.

दोन्ही मुलांना तातडीने कटवार बाजार येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सुरियावान येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेला “अत्यंत दुर्दैवी” असे संबोधत उपविभागीय अधिकारी नवीन कुमार यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेस जबाबदार आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच, राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती मदत तरतुदींनुसार मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत पुढील तीन ते चार दिवसांत दिली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.