
‘जंतर मंतर’वर सरकारविरुद्ध आंदोलन करणारी पोरं जेव्हा एके-47, अश्रुधूर, खिळे लावलेले दंडुके, पॅलेट गन्स, भाजप ‘ट्रोल’ आर्मीच्या बदनामीचा सामना करत होती तेव्हा भाजपची मातृसंस्था संघरूपी ‘आई’ काय करत होती? ती पोरांच्या बचावासाठी रस्त्यावर का उतरली नाही? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘जेन झी’ला खतरनाक व्हायरस, तुकडे-तुकडे गँग म्हणून अपराधी ठरवतात व सरसंघचालक त्याच तुकडे-तुकडे गँगशी संवाद साधण्याचे ठरवतात. हा त्यांच्या परिवारातला ‘केमिकल लोचा’ आहे. त्यामुळेच भाजपची आई सध्या काय करते, या प्रश्नाचे उत्तर जनता शोधत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. त्यामुळे आई सध्या काय करतेय? असा प्रश्न भारतवासीयांना पडला आहे. ‘जंतर मंतर’ आंदोलनानंतर देशात बरेच काही बदललेले दिसत आहे. पंतप्रधान मोदी व अमित शहा अचानक गायब झाले आहेत. मात्र सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी ‘जेन झी’शी संवाद साधण्याचे ठरवले आहे. मुंबईत दोनेक हजार ‘जेन झी’शी मोहनराव स्वतः बोलणार आहेत. पोरांचे मन जाणून घेणार आहेत. पोरांच्या मनात इतकी खळबळ का माजली आहे ते भागवत समजून घेणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला ‘आंदोलना’मुळे हादरलेल्या त्यांच्याच सरकारने ‘जेन झी’ला निपटवण्याची पूर्ण तयारी केली आहे. सरकारची ताकद पोरांना चिरडण्यासाठी लावली जात आहे. पोलीस, प्रशासन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तमाम संघटनांना पोरांच्या विरोधात सक्रिय केले आहे. बजरंग दलाच्या लोकांनी आधीच आंदोलनकारी पोरांना धमकावणे व मारणे सुरू केले. या वातावरणात सरसंघचालक नक्की कोणत्या ‘जेन झी’शी संवाद साधणार आहेत? संघ स्वयंसेवक, भाजप पदाधिकाऱ्यांची मुले किंवा नातवंडांना ‘जेन झी’ म्हणून जमा करून सरसंघचालक त्यांच्याशी संवाद करणार असतील तर ते योग्य नाही. भागवतांनी प्रत्यक्ष आंदोलनात उतरलेल्या, शहांच्या आदेशाने पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जखमी झालेल्या पोरांशी संवाद साधायला हवा. मुंबईतल्या आंदोलनात पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरशी संघाने संवाद साधायला हवा. तिने पोलिसांची गाडी अडवली व बेकायदेशीरपणे अटक केलेल्या आंदोलक पोरांची सुटका केली. आता पोलीस व भाजपच्या
भाडोत्री तट्ट्यांकडून
रियाचा छळवाद सुरू आहे. रिया दोन दिवसांपूर्वी दिल्लीत येऊन राहुल गांधींना भेटली व पोलीस छळाची कहाणी मांडली. रियाप्रमाणे असंख्य मुला-मुलींना अशा छळाला सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आंदोलनकर्त्या मुलांना माफ केले असे जाहीर केले तरीही पोलीस व भाजपचे लोक या मुलांना त्रास देत आहेत. गृहमंत्री अमित शहा हे मोदींचे आदेश मानत नाहीत काय? पंतप्रधान माफी देतात व गृहखाते नेमकी विरुद्ध भूमिका घेताना दिसते. हे सरकारमधील अराजक आहे. पोरं विद्यापीठांत शिकत आहेत व पोलीस त्यांच्या घरी पोहोचून पालकांना त्रास देत असतील तर मोहन भागवत यांनी हे थांबवायला हवे. संघाने 1975 ला आणीबाणीस विरोध केला होता. सरकारविरुद्ध संघर्ष, आंदोलने, हरताळ वगैरे कृत्यांवर तेव्हा बंदी होती व ही एकप्रकारे हुकूमशाही असल्याची बोंब तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठोकली. संघाच्या तेव्हाच्या नेत्यांना, स्वयंसेवकांना अटक झाली. ते तथाकथित स्वातंत्र्यसैनिक आता सत्तेत आहेत व मोदी-शहांच्या मनमानीस विरोध करणाऱ्या पोरांचा छळ उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. भारतीय लोकशाहीचे रूपांतर मोदी व शहांनी एकाधिकारशाहीत केले. सर्व संवैधानिक संस्था मोडीत काढल्या. राष्ट्रीय संपत्ती खासगी लोकांना विकली जात आहे. मानवी मूल्याचे हनन सुरू आहे. या सगळ्या विरोधात खरे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आवाज उठवून देशभक्तीचा स्फोट करायला हवा होता. पण मोदी-शहांच्या
पापी मंगल मिलनात
संघ सामील झाला व भारतातील पोरांनी रस्त्यावर उतरून हुकूमशाहीचा धिक्कार केला तेव्हाही संघ मौन व्रत धारण करून बसला, हे मोहन भागवतांना योग्य वाटते काय? संघाचे नेते अतुल लिमये यांनी आंदोलनकारी पोरांचा उल्लेख ‘देशद्रोही’ असा केला आहे. जंतर मंतरचे आंदोलन व त्यांना समर्थन देणारे देशभरातील लाखो ‘जेन झी’ देशद्रोही ठरवले जात असतील तर सरसंघचालक त्या पोरांशी संवाद साधण्यासाठी मैदानात का उतरले? अशा देशद्रोह्यांशी संवाद साधल्याबद्दल अतुल लिमयेंसारखे लोक उद्या सरसंघचालकांनाही देशद्रोही ठरवतील. मोहन भागवत यांनी ‘संघी’ जेन झींचा मेळावा घेण्यापेक्षा पोलिसांकडून पोरांवर होणारे अत्याचार, खोटे गुन्हे थांबवायला हवेत. पोरांना उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा त्यांच्यावर अमित शहांनी सोडलेल्या पोलिसांना आवरणे ही संघाची प्राथमिकता असायला हवी. ‘जंतर मंतर’वर सरकारविरुद्ध आंदोलन करणारी पोरं जेव्हा एके-47, अश्रुधूर, खिळे लावलेले दंडुके, पॅलेट गन्स, भाजप ‘ट्रोल’ आर्मीच्या बदनामीचा सामना करत होती तेव्हा भाजपची मातृसंस्था संघरूपी ‘आई’ काय करत होती? ती पोरांच्या बचावासाठी रस्त्यावर का उतरली नाही? पोलिसांनी मुलींचा भररस्त्यात विनयभंग केला. त्यावर गृहमंत्र्यांनी खरे तर माफी मागायला हवी, पण गृहमंत्री संसदेतून पसार आहेत. संघाने गृहमंत्र्यांना धरून सभागृहात आणावे. हे जमत नसेल तर ‘जेन झी’प्रश्नी फुकट फौजदारकी करू नये. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘जेन झी’ला खतरनाक व्हायरस, तुकडे-तुकडे गँग म्हणून अपराधी ठरवतात व सरसंघचालक त्याच तुकडे-तुकडे गँगशी संवाद साधण्याचे ठरवतात. हा त्यांच्या परिवारातला ‘केमिकल लोचा’ आहे. त्यामुळेच भाजपची आई सध्या काय करते, या प्रश्नाचे उत्तर जनता शोधत आहे.































































