जाऊ शब्दांच्या गावा – गावठी आणि व्हिलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे, [email protected]

प्रवासात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एखादी अनोळखी व्यक्ती भेटली की गप्पा सुरू होतात. या गप्पांमध्ये सुरुवातीला दोन गोष्टींचा उल्लेख आवर्जून असतोच असतो; तो म्हणजे नाव आणि गाव. याचा अर्थ, एखाद्या मनुष्याची ओळख करून घेण्यात त्याचं नाव आणि गाव हे महत्त्वाचे घटक ठरतात.

गाव म्हणजे वस्तीचं ठिकाण. मराठीत हा शब्द संस्कृतमधील ‘ग्राम’ शब्दावरून आला. समूह या अर्थाचा संस्कृत शब्द ‘ग्राम’ हा ‘ग्रस्’ धातूपासून तयार झाला आहे. या ‘ग्रस्’ शब्दामध्येच समुच्चयवाचक भाव आहे. आपण जेवताना ‘घास’ घेतो, हा शब्दही ‘ग्रस्’ धातूपासून तयार झाला आहे. ‘घास’ म्हणजे ताटातल्या अन्नाचा आपल्या बोटांच्या चिमटीत मावेल एवढा भाग आणि तो एकप्रकारे अन्नाचा समूहच असतो. ‘ग्राम’ शब्दाची बदललेली रूपं मराठीप्रमाणे इतर अनेक भाषांतही पाहायला मिळतात. ग्रामचा अपभ्रंश ‘गाँअ’ झाला. बंगाली आणि उडिया या भाषांमध्ये ‘गॉ’, बिहारी आणि हिंदीमध्ये ‘गाँव’, पंजाबीमध्ये ‘गराँ’, सिंधीमध्ये ‘गाऊँ’ किंवा ‘गामु’, गुजरातीमध्ये ‘गाम’, नेपाळीमध्ये ‘गाउँ’ असे उच्चार आहेत.

भटक्या अवस्थेतून मनुष्याने वस्ती केली, ती सुरुवातीला एकाच जातीच्या लोकांची होती. कालांतराने मनुष्याच्या गरजा लक्षात घेऊन गावामध्ये संमिश्र जातींच्या लोकांचा समावेश होत गेला. अशा प्रकारे विभिन्न जातीची गावं वसली, त्यांना संग्राम (सम्+ग्राम) म्हटलं गेलं. पण आज संग्राम शब्दाचा अर्थ आहे, युद्ध किंवा लढाई. गाव एका जातीचं असो किंवा विभिन्न जातींचं, तिथं राहणाऱ्या लोकांच्यात केव्हा ना केव्हा, कशावरून तरी वाद होणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. हे वाद सोडवण्यासाठी पंचायत ही व्यवस्था असे. आज ती जागा ग्रामपंचायतीने घेतली आहे. तिथल्या ग्रामसभांचं स्वरूप पाहिलं तर ‘संग्राम’ शब्दाला युद्ध हा अर्थ का प्राप्त झाला असेल हे लक्षात येतं. म्हणजे गावातील वाद संवादातून सोडवले नाही तर त्याला युद्धाचं स्वरूप येण्याची शक्यता असे. पण कालांतराने ‘युद्ध’ या शब्दाला पर्याय म्हणून ‘संग्राम’ हाच शब्द वापरला जाऊ लागला.
‘गाव’ या शब्दावरून तयार झालेले कित्येक शब्दप्रयोग आहेत. उदा. गावकरी म्हणजे आपल्या गावात राहणारा, गावात ज्याचं घरदार आहे असा रहिवासी. गावठाण (ग्रामस्थान) म्हणजे वस्तीची जागा, किंवा गावाची पांढरी. गावंदर म्हणजे गावालगतची जमीन. ही जमीनही शेतीयोग्य नसे. गावकरी या जागेचा वापर शेतीपूरक कामांसाठी, म्हणजे गुरांचे गोठे, वैरण लावणं, उकिरडे, खळे इ.साठी करत.

गावकी म्हणजे गावचा कारभार; तर गावगाडा म्हणजे गावाचा कारभार व कारभारी माणसे. गावकुटाळ म्हणजे गावातील टवाळ. गावगन्ना म्हणजे प्रत्येक गावास (गाव गना) उदा. गावगन्ना ताकीद करून सर्व लोक बोलावून आणा. गावपंटक किंवा गावगुंड म्हणजे गावातील त्रासदायक पुंड; गावात भांडणं, लफडी उत्पन्न करणारा, गावभेद्या. गावझाडा म्हणजे गावातील उत्पन्नाचा हिशोब व त्याचा कागद; गावातील शेत इ. जमिनीचा कुळकर्ण्याने तयार केलेला वर्णनपर तक्ता किंवा कुळकर्णीदप्तर.

‘गावठी’ शब्दाचा अर्थ मात्र आज फार बदललेला दिसतो. या शब्दाचा मूळ अर्थ गावठाणात राहणारा गावकरी, गावी स्थायिक असणारा, असा होता. कालांतराने हा शब्द खेळवळ, गावंढळ, ज्याला शहरी चालीरीती माहीत नाहीत, सामान्यज्ञान नाही, या अर्थी वापरला जाऊ लागला. आता तर एखाद्या व्यक्तीस इंग्रजीचे उच्चार नीट जमले नाहीत तरी त्याला ‘गावठी’ म्हटलं जातं. याला शब्दाचा अर्थसंकोच म्हणावं की अर्थविस्तार?

मराठीतील गावठी शब्दाप्रमाणेच इंग्रजीतील villain (खलनायक) शब्दाचं झालं आहे. व्हिलन हा शब्द लॅटिन भाषेतील villa (विला – म्हणजेच शेतीची मोठी जागा, फार्महाऊस) या शब्दापासून आला आहे. लॅटिनमध्ये ‘विला’वर काम करणाऱ्या किंवा तिथे राहणाऱ्या शेतमजुराला किंवा नोकराला villanus म्हणजे शेतमजूर किंवा शेतकरी म्हटलं जाई. मध्ययुगात हा शब्द फ्रान्समध्ये गेला आणि तिथं खेडेगावचा सामान्य शेतकरी किंवा गरीब कामगार या अर्थाने वापरला जाऊ लागला.

मध्ययुगीन युरोपमध्ये शहरात राहणारे उच्चभ्रू, सरंजामशहा स्वतःला खूप सुसंस्कृत आणि प्रतिष्ठत मानत असत. त्यांच्या मते, खेडूत लोकांकडे सभ्य शिष्टाचार नसतात. त्यामुळे कालांतराने, विशेषतः 16 व्या शतकात या अर्थात बदल होऊन व्हिलन शब्द ‘दुराचारी, लबाड किंवा गुन्हेगार’ या अर्थाने वापरला जाऊ लागला. आता आपल्या ‘गावठी’चा अर्थ ‘व्हिलन’ होऊ नये इतकीच अपेक्षा आहे!