
मुंबईतील 16 एकरांचे तीन भूखंड एकाच ट्रस्टला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ‘मुंबईतील मोकळ्या जागा ढापायच्या आणि भाजपच्या नेत्यांना द्यायच्या असे धोरणच मुख्यमंत्र्यांनी राबवलेले आहे,’ असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. शिवसेना त्यास कडाडून विरोध करेल, रस्त्यावर उतरेल’, असा इशाराही त्यांनी दिला.
‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापौर बंगल्यावरील उधळपट्टीविरोधात शिवसेनेने आवाज उठवताच त्या खर्चाला स्थगिती देण्यात आली. त्या निर्णयाचे स्वागत करताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागा ढापण्याच्या भाजपच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवला. ‘मुंबईतील नेव्हिल डिसोझा फुटबॉल टर्फ बळकावले जाणार आहे. हे टर्फ आवडत्या कंत्राटदाराला देऊन तिथे कन्व्हेन्शन सेंटर बनवून आणि त्याला भाजपच्या नेत्याचे नाव द्यायचे असे षड्यंत्र आहे. त्याचबरोबर रंगशारदा सभागृह भाजपचा एक बिल्डर विकत घेणार आहे. त्यामागील झोपडपट्टीचा पुनर्विकास मुख्यमंत्र्यांच्या जवळचे बिल्डर करणार आहेत,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईतील 16 एकरची जागा एका ट्रस्टला देण्यात आली आहे. त्यात अंधेरीतील मैदानाचा समावेश आहे. त्याशिवाय एक मियावाकी जंगल आहे. तेही या ट्रस्टने ढापले आहे. हे मैदान आणि म्हाडाचे दोन भूखंड एकाच ट्रस्टला देण्यात आले आहेत. या ट्रस्टने हे मैदान 21 लाख रुपये भाडेतत्त्वावर दिले आहे. ते महापालिकेला मिळू शकले असते. शिवाय म्हाडाचे दोन्ही भूखंड या ट्रस्टला फुकट देण्यात आले आहेत. का दिले, कशासाठी दिले, मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव होता, अंतर्गत होता की वरून होता हे कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांना एखाद्या विशिष्ट भाषेला किंवा संस्थेला प्राधान्य द्यायचे आहे, असा आरोप मी करणार नाही. पण मुंबईतील मोकळी मैदानं ढापायची आणि भाजपच्या नेत्यांना द्यायची या धोरणाला आम्ही विरोध करणार, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
‘मुंबईकर्स नॉट अलाउड’ अशा पाटय़ा लावणार का?
‘आतापर्यंत जी मैदाने मोकळी होती, मुंबईसाठी होती, तिथं आता मुंबईकरांना जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. विनापरवाना प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देणारे बोर्ड संबंधित ट्रस्टने लावले आहेत. मुंबईकर हे आता घुसखोर झालेत का? ब्रिटिशांच्या काळात ‘इंडियन्स नॉट अलाउड’ अशा पाटय़ा काही ठिकाणी लावल्या जायच्या. त्याप्रमाणे ‘मुंबईकर्स नॉट अलाउड’ अशा पाटय़ा लागणार आहेत का,’ असा रोकडा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. एकीकडे अदानी मुंबई गिळत चालले आहेत. धारावीसाठी आमचा लढा सुरूच आहे. हे सुरू असताना एका संस्थेला 16 एकर जागा देणे हा मोठा गुन्हा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
येत्या आठवडय़ात आंदोलन
मुंबईतील जमिनी ढापण्याचा जो कार्यक्रम राबवला जात आहे, त्या विरोधात येत्या आठवडय़ात शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. ‘शिवसेनेचे आंदोलन कधी आणि कसे होईल हे लवकरच जाहीर करू, मात्र मुंबईतील 16 एकर जमीन एका संस्थेला फुकटात देणे ज्यांना चुकीचे वाटते त्या सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी समस्त मुंबईकर, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण सोसायटय़ा आणि राजकीय पक्षांना केले.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा लिलाव सुरू केला आहे का?
बोली जिंकून या जागा घेतल्याचा दावा भाजपच्या संबंधित आमदाराने केल्याचे पत्रकारांनी सांगताच आदित्य ठाकरे संतापले. ‘मुंबईच्या जागेवर बोली लागते? मुख्यमंत्री आता बोली लावायला लागलेत? मुंबईचा लिलाव सुरू केला आहे का? हा काय घोडेबाजार वाटला? पन्नास खोके देऊन आमदार विकत घ्यायची सवय भाजपला असेल पण म्हणून मुंबईच्या जागांचाही लिलाव करणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
शाळांनीही मैदाने बळकावली
शिवसेनेची सत्ता असताना मुंबईतील महापालिकांची मैदाने आणि उद्याने सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुली राहतील असा नियम होता. आता तर काही शाळांनीही मोकळी मैदाने महापालिकेकडून घेऊन तिथे टर्फ टाकून सर्वसामान्यांना बंदी घातली आहे, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.
उद्या हे लोक आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान आणि शिवतीर्थही घ्यायला कमी करणार नाहीत.

























































