
डॉक्टर संपावर उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र संताप व्यक्त केला. काहीही झाले तरी आणि कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांनी संप करूच नये. तुमच्या संपामुळे एखाद्याचा जीव गेला तर काय कराल, अशा शब्दांत न्यायालयाने डॉक्टरांचे कान उपटले. आम्ही संप मागे घेत आहोत, मात्र होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यास दिलेल्या परवानगीविरोधात आमचे आंदोलन आणि निदर्शने सुरूच राहतील, असे मार्डने न्यायालयात स्पष्ट केले.
डॉक्टर संपाचे प्रकरण न्यायालयाने स्युमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
नीटची परीक्षा देऊन मग डॉक्टर होता येते. होमिओपॅथीचा सहा महिन्यांचा कोर्स करणारा पण कौन्सिलकडे नोंदणी करू शकतो. ही पद्धतच चुकीची असून आमचा याला विरोध आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे वकील सुरेश कामदार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आम्ही या मुद्दय़ावर सविस्तर सुनावणी घेऊ. डॉक्टरांनी संप करू नये, अशा प्रकारचे आदेश दिले जातील, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केले.
शिकाऊ पायलटला विमान चालवण्याची परवानगी
होमिओपॅथी डॉक्टरांना कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणे म्हणजे शिकाऊ पायलटला अपघात होईपर्यंत विमान चालवण्यास सांगण्यासारखे आहे, असे खडेबोल न्यायालयाने राज्य शासनाला सुनावले.
गेलेला जीव परत कसा आणाल?
आम्हाला महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी आहे. तुम्ही संप करून लोकांचे जीव धोक्यात घालू नका, असा सज्जड दम न्यायालयाने दिला. तुम्ही मागण्यांसाठी संप करत आहात. या संपात एखाद्या रुग्णाचा उपचाराविना जीव गेला. नंतर तुमच्या मागण्या मान्य झाल्यास तुम्ही निधन झालेल्या माणसाला परत कसे आणाल? तेव्हा काहीही झाले तरी डॉक्टरांनी संपाचे हत्यार काढू नये, असे खंडपीठाने नमूद केले.
























































