
ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास कराड येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
अत्यंत संघर्षमय वातावरणात घडलेल्या श्रीनिवास कुलकर्णी यांचे मराठी साहित्यातील योगदान चिरंतन टिकणारे आहे. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या अजरामर साहित्यकृती तसेच मौज प्रकाशनाचे संपादक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी कायम स्मरणात राहील. त्यांना राज्य शासनाच्या मानाच्या ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.


























































