
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर 2021 पासून आतापर्यंत तब्बल 557 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सरकारने ही अधिकृत माहिती दिली असली तरी अद्याप काही दौऱ्यांचा हिशोब पूर्ण व्हायचा असल्याने हा आकडा वाढू शकतो. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी एका लेखी उत्तरात कोणत्या वर्षी कोणत्या देशांचा दौरा झाला, प्रत्येक प्रवासावर किती खर्च झाला याची माहिती दिली.
सरकारी आकडेवारीनुसार, २०२१ पासून आतापर्यंत पीएम मोदींच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे ५५७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, काही दौऱ्यांचे बिल भरणे अद्याप बाकी असून अंतिम रकमेत पुढे बदल होऊ शकतो, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
कोणत्या वर्षी किती खर्च झाला?
२०२१: २०२१ मध्ये पंतप्रधानांनी बांगलादेश, अमेरिका, इटली आणि ब्रिटनचा दौरा केला. या प्रवासांवर सुमारे ३६.१२ कोटी रुपये खर्च झाले. यामध्ये सर्वाधिक खर्च २२ ते २६ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अमेरिका दौऱ्यावर (१९.६३ कोटी रुपये) झाला.
२०२२: २०२२ मध्ये पंतप्रधान जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्स, नेपाळ, जपान (दोनदा), उझबेकिस्तान, यूएई आणि इंडोनेशियाच्या दौऱ्यावर गेले होते. यावर एकूण ५५.८३ कोटी रुपये खर्च झाले. या वर्षातील जूनमधील जर्मनी दौरा सर्वात महागडा ठरला, ज्यावर १४.४७ कोटी रुपये खर्च झाले.
२०२३: या वर्षी पंतप्रधानांनी जपान, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, अमेरिका, इजिप्त, फ्रान्स, यूएई, दक्षिण आफ्रिका, ग्रीस आणि इंडोनेशियासह अनेक देशांचे दौरे केले. यावर एकूण ९३.६३ कोटी रुपये खर्च झाले. यातील सर्वाधिक खर्च जून महिन्यातील अमेरिका दौऱ्यावर (२२.८९ कोटी रुपये) झाला.
२०२४: यूएई, कतार, भूतान, इटली, रशिया, ऑस्ट्रिया, पोलंड, युक्रेन, ब्रुनेई, सिंगापूर, अमेरिका, लाओस, नायजेरिया, ब्राझील, गयाना आणि कुवेत या देशांच्या दौऱ्यांवर सुमारे १०९.५१ कोटी रुपये खर्च झाले. रशियाच्या दोन दौऱ्यांवर मिळून १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला, तर सप्टेंबरमधील अमेरिका दौऱ्यावर १५.३३ कोटी रुपये खर्च झाले.
२०२५: या वर्षी पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक देशांचा दौरा केला. फ्रान्स, अमेरिका, मॉरिशस, थायलंड, श्रीलंका, सौदी अरेबिया, कॅनडा, ब्राझील, ब्रिटन, मालदीव, चीन, जपान, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक देशांच्या दौऱ्यांवर एकूण १८७.८३ कोटी रुपये खर्च झाले. हा आतापर्यंतचा एका वर्षातील सर्वाधिक खर्च ठरला. यातील फ्रान्स दौरा सर्वात महागडा (२५.५९ कोटी रुपये) होता.
२०२६: २०२६ मध्ये जुलैपर्यंत मलेशिया, इस्रायल, यूएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे, इटली, स्लोव्हाकिया, सेशल्स, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यांवर आतापर्यंत ७४.५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. काही दौऱ्यांची बिले अजून बाकी असून जून २०२६ मधील फ्रान्स दौऱ्याचा खर्च अद्याप यामध्ये जोडलेला नाही, असे सरकारने सांगितले.



























































