
हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांना अनेक दिवसांची वाट पाहावी लागते. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे हिंदुस्थान-पाकिस्तान हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांना कडवी झुंज देताना दिसून येतात. आता पुन्हा एकदा आशिया चषकाच्या निमित्ताने हिंदुस्थान-पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज झाले आहे. Women’s Asia Cup 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ही स्पर्धा 28 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2026 दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत असून, यात हिंदुस्थान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि आयोजक यूएईचा समावेश आहे. गतविजेतेपदाचा मान श्रीलंका संघाकडे असून, सर्व सामने टी-20 फॉर्मेटमध्ये खेळवले जाणार आहेत. दोन गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात आली असून टीम इंडिया ‘अ’ गटामध्ये आहे. ‘अ’ गटात टीम इंडियासह, पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. तर उर्वरीत श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि युएई संघांचा समावेश ‘ब’ गटात करण्यात आला आहे.
अधिकृत वेळापत्रकानुसार, टीम इंडियाचा पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध खेळला जाईल, तर दुसरा सामना 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग आणि 5 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. थायलंड आणि हाँगकाँगविरुद्ध टीम इंडियाचे पारडे जड मानले जात असून पाकिस्तानविरुद्ध होणारा सामना चाहत्यांच लक्ष वेधून घेणारा ठरू शकतो. त्यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याची वाट पाहतायत. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील हा बहुप्रतिक्षित सामना 5 सप्टेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
आशिया चषक 2026 साठी हिंदस्थानचा महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मनधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी. कमलिनी (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेनुका ठाकूर, नंदिनी शर्मा आणि क्रांती गौड.
राखीव खेळाडू
प्रतिका रावल, उमा चेत्री (यष्टीरक्षक), वैष्णवी शर्मा, सायली सातघरे आणि मिन्नू मणी





























































