Nandes News हरभरा बियाणावरील कीटकनाशकाचा फैलाव; दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून ठेवण्यात आलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोही मल्लेश डेबेकर (वय ६) व आराध्या मल्लेश डेबेकर (वय ४) या दोन्ही बहिणी ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री आपल्या आई-वडिलांसोबत घरात झोपल्या होत्या. याच खोलीत हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून पोत्यामध्ये ठेवण्यात आलेले कीटकनाशक होते. रात्रीच्या वेळी या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने त्याचा परिणाम कुटुंबातील सर्वांवर झाला. कीटकनाशकाचा प्रभाव झाल्याने आई-वडील आणि दोन्ही मुलींना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर दि.६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ च्या दरम्यान आरोही व आराध्या या दोन्ही चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला. मल्लेश डेबेकर यांना या दोनच मुली होत्या. एका दुर्दैवी घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने डेबेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनीही या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता बाळापूर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात दोन्ही चिमुकल्या बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे ग्रामीण भागात बियाणे साठवताना वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.