
विद्यार्थ्यांवरील पोलिसी अत्याचार आणि राम मंदिर लुटीच्या मुद्दय़ावरून विरोधकांचे सरकारवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांचा धसका घेतलेल्या केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सभागृहात येणेच बंद केले आहे. आज भर पावसात ते संसद भवनात आले, मात्र सभागृहात फिरकले नाहीत. विरोधकांनी शहांच्या उपस्थितीचा व निवेदनाचा मुद्दा लावून धरल्याने गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौदावा दिवस होता. मात्र हा दिवसही गोंधळ, गदारोळातच गेला. जेन-झी आंदोलकांवरील हल्ला व राम मंदिर लुटीच्या मुद्दय़ावर शहा यांनी सभागृहात निवेदन करावे असा आग्रह विरोधकांनी धरला आहे. मात्र शहा सभागृहातच येत नसल्याने कामकाज ठप्प आहे. लोकसभेत कामकाज सुरू होताच आज गदारोळाला सुरुवात झाली. दिल्लीत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने सभागृहात सदस्यांची संख्याही कमी होती. गदारोळ सुरू झाल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही विरोधकांनी सरकारला घेरले. अमित शहा सभागृहात या, या घोषणांनी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृह दणाणून सोडले. या गदारोळामुळे सुरुवातीला दुपारी सव्वा बारापर्यंत, त्यानंतर दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
मी कधी, काय बोलायचे हे तुम्ही ठरवणार का?
मल्लिकार्जुन खरगे यांनी शहांच्या निवेदनाची मागणी केली. त्यास रिजीजू यांनी आक्षेप घेतला. खरगे हे रोज तेच-तेच मुद्दे मांडत आहेत. नियमाच्या आधारे बोलत नाहीत. एकच मागणी करत आहेत. त्यांच्यामुळे पवन खेरा यांच्यासह नव्या खासदारांना बोलायची संधीच मिळत नाही, असे रिजीजू म्हणाले. त्यावर खरगे संतापले. ‘‘मी काय, कसे व कधी बोलायचे हे तुम्ही ठरवणार का? तो माझा अधिकार आहे. रिजीजूंकडून मला शिकावे लागणार का,’’ असा सवाल खरगे यांनी केला.
रिजीजू पुन्हा राहुल गांधींना भेटले
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी आज पुन्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. मात्र हे विधेयक आणण्याआधी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केल्याचे सूत्रांकडून समजते.
‘बीएचएमएस’ डॉक्टरांना अॅलॉपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी आणि प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने पालिकेच्या केईएम रुग्णालात निवासी डॉक्टरांनी गुरुवारी निदर्शने केली. राज्यभरात सुरू केलेले बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचे ‘मार्ड’ने जाहीर केले आहे.

























































