
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिह्यातील नागोठणे येथील खचलेला उड्डाणपूल, इंदापूर आणि माणगावमधील बायपासचे रखडलेले काम आणि मुसळधार पावसामुळे खड्डे बुजवण्यात येणारे अडथळे यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही गोवा महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची चिन्हे आहेत. मात्र या संभाव्य वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी इंदापूर बायपासवरील एक मार्गिका (लेन) गणेशोत्सवात सुरू करण्याची योजना आहे. निदान त्यामुळे गणेशभक्तांना थोडा दिलासा मिळणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि कामाला वेग देण्याचे आदेश दिले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील चौदा-पंधरा वर्षांपासून रखडले आहे. गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे दरवर्षी सांगितले जाते, पण अजूनही काम पूर्ण होताना दिसत नाही. इंदापूर आणि माणगावमध्ये सर्वात जास्त वाहतूककोंडी होते. त्यावर उपाय करण्यासाठी इंदापूर आणि माणगावमध्ये बायपास रस्ता करण्याचे काम सुरू आहे, पण हे कामही रखडले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सुटत नाही.
माणगाव आणि इंदापूरमधील बायपासचे काम गणेशोत्सवाआधी होणार नाही. बायपासचे काम सुरू असले तरी माणगावमधील रेल्वे पूल आणि नदी पुलाचे काम होण्यास डिसेंबर उजाडणार आहे. पण गणेशोत्सवात इंदापूर बायपासवर एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
महामार्गावरील चार उडाणपुलांचे काम गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावा. तसेच या महामार्गावरील खड्डे बजवून गणेशभक्तांना दिलासा द्यावा. – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री
नागोठणे पुलासाठी आयआयटीचा अहवाल
नागोठणे येथील उड्डाणपूल सुरू केला, पण दोन महिन्यांत या पुलाला तडे जाऊन पूल खचला. या पुलाच्या दुरुस्तीपूर्वी आयआयटीकडून अहवाल मागवला जाणार आहे. त्यानंतर पुलाची दुरुस्ती होईल. त्यामुळे गणेशोत्सवात या उड्डाण पुलावरून वाहतूक होणार नाही. लांजा, कोलेटी, संगमेश्वर तसेच निवळी येथील उड्डाण पुलांचे काम गणेशोत्सवाआधी मार्गी लागणार आहे. खेड येथे खचलेल्या भागाचीही दुरुस्ती करण्यात येत आहे. भोस्ते घाटाचे कामही वेगाने मार्गी लावले जात आहे.





























































