अहमदाबाद राष्ट्रकुलच्या तयारीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर आता पुढील पर्वाच्या तयारीला अहमदाबाद लागले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज अधिकृतपणे गुजरातकडे सुपूर्द करण्यात आला असून, त्यासह 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारीही हिंदुस्थानने स्वीकारली आहे. हा ऐतिहासिक ध्वज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सोपवण्यात आला आणि त्यानंतर अहमदाबादमध्ये स्पर्धेच्या तयारीचे औपचारिक बिगुल वाजले. 2030 मध्ये अहमदाबाद राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असून, जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धेसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू होणार आहे. क्रीडांगणे, खेळाडूंसाठी निवासव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा आणि तंत्रज्ञान या सर्व बाबींमध्ये जागतिक दर्जाचे नियोजन करण्यात येणार आहे.

मेस्सीचा मानवतेला सलाम

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचीती दिली आहे. स्पेनची राजधानी माद्रिद परिसरात झालेल्या भीषण वणव्यानंतर बाधित भागांच्या पुनर्बांधणीसाठी त्याने आर्थिक मदतीचा हात पुढे करताना 80 हजार युरोंची मदत केली आहे. मेस्सीच्या या उदार निर्णयाचे स्पेनसह जगभरातून कौतुक होत आहे. मैदानावर गोलांचा वर्षाव करणाऱ्या मेस्सीने मैदानाबाहेरही माणुसकीचा गोल करून लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

कार्लोस अल्काराजची माघार

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्काराजने मनगटाच्या जुन्या दुखापतीमुळे सिनसिनाटी ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे हंगामातील अखेरच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये त्याच्या सहभागाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. एप्रिलनंतर अल्काराज एकही स्पर्धात्मक सामना खेळू शकलेला नाही. सिनसिनाटी ओपनमध्ये तो गतविजेता म्हणून उतरून विजेतेपदाचे संरक्षण करणार होता. ही स्पर्धा यूएस ओपनपूर्वीची सर्वात महत्त्वाची तयारी मानली जाते. मात्र, स्पर्धेचे संचालक बॉब मोरान यांनी अधिकृत निवेदनाद्वारे अल्काराजच्या माघारीची पुष्टी केली.

ब्रॉक लेसनर रेसलिंगमधून निवृत्त

डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगवर दोन दशकांहून अधिक काळ प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणाऱ्या ‘द बीस्ट’ ब्रॉक लेसनरने अखेर व्यावसायिक रेसलिंगमधून निवृत्ती जाहीर केली. समरस्लॅममध्ये नायजेरियाच्या उदयोन्मुख स्टार ओबा फेमीकडून झालेल्या पराभवानंतर लेसनरने आपल्या कारकिर्दीवर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी रेसलमेनिया 42 मध्येही फेमीकडून पराभव पत्करल्यानंतर त्याने रिंगमध्येच बूट आणि ग्लोव्हज् ठेवत निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर ‘क्लॅश इन इटली’मध्ये पुनरागमन करत त्याने फेमीला पराभूत केले. तरीही समरस्लॅममधील ‘हेल इन अ सेल’ सामन्यात नव्या दमाच्या फेमीने लेसनरचा शेवट गोड होऊ दिला नाही. सामन्यानंतर लेसनरने फेमीचा हात उंचावत त्याला ‘डब्ल्यूडब्ल्यूईचे भविष्य’ असे संबोधले, तर स्वतःला ‘कालचा इतिहास’ असल्याचे मान्य केले.