
ODI World Cup 2027 चा धमाका पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये पार पडणार आहे. वर्ल्ड कपची चमचमती ट्रॉफी उचलण्यासाठी 14 संघ एकमेकांना कडवी झुंज देतील. मात्र, त्यासाठी काही संघांना पात्रता फेरीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. याच पात्रता फेरीच्या तारखा ICC ने जाहीर केल्या आहेत. पुढच्या वर्षी 22 फेब्रुवारी ते 23 मार्च असा महिनाभर पात्रता फेरीचे सामने खेळले जातील.
आयसीसीच्या नव्या नियमांनुसार पात्रता फेरीत विजयी होणाऱ्या संघांना विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळेल. तर या फेरीमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहणाऱ्या संघांमध्ये ‘सुपर सीरीज’ खेळवली जाईल. या सुपर सीरीजमध्ये अव्वल ठरणारा संघ मुख्य विश्वचषकात सहभागी होईल. स्पर्धेचे आयोजन आणि कट-ऑफ तारीख हा बहुप्रतिक्षित वनडे विश्वचषक पुढील वर्षी 4 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणार आहे. यासाठी 30 सप्टेंबर 2026 ही आयसीसी वनडे क्रमवारीची कट-ऑफ तारीख ठरवण्यात आली आहे. यादरम्यान क्रमवारीत अव्वल 8 मध्ये राहणारे संघ थेट पात्र ठरतील, तर यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी आधीच आपले स्थान पक्के केले आहे. IndiaTv ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पात्रता फेरीत खेळणारे संघ आणि प्लेऑफचे समीकरण पुढील प्रमाण असेल. क्वालीफायर सामन्यांमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये क्रमवारीत तळाचे दोन संघ, क्रिकेट वर्ल्ड कप लीग-2 मधील टॉप 4 संघ आणि वर्ल्ड कप क्वालीफायर प्लेऑफमधून येणारे 4 संघ समाविष्ट असतील. या प्लेऑफ सामन्यांमध्ये लीग-2 मधील 5 व्या ते 8 व्या क्रमांकाचे संघ आणि चॅलेंजर्स लीगचे 4 संघ मिळून एकूण ८ संघ एकमेकांशी भिडतील, ज्यातून अव्वल 4 संघ मुख्य क्वालीफायरसाठी निवडले जातील.


























































