
राज्यातील महायुती सरकारने मनमानी चालवली असून जन्म-मृत्यू दाखल्याच्या शुल्कात शासनाने 10 पट वाढ केली आहे. पूर्वी यासाठी दोन रुपये द्यावे लागत होते. आता त्यासाठी 20 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे विलंब शुल्कातही वाढ करण्यात आली असून आता यासाठी 50 ते 100 रुपये द्यावे लागतील. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.
जन्म व मृत्यू प्रमाणपत्र हे शासकीय कागदपत्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शाळा प्रवेश, जात प्रमाणपत्र, आधार व इतर विविध शासकीय सेवांसाठी जन्म दाखला आवश्यक असतो. तर वारसा हक्क, मालमत्ता हस्तांतरण, विमा, पेन्शन आणि इतर आर्थिक लाभांसाठी मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. 30 दिवसांत प्रमाणपत्र काढल्यास 20 रुपये लागतील, तर 30 दिवसांनंतर एका वर्षापर्यंत 50 रुपये विलंब शुल्क लागेल. पूर्वी 5 रुपये आकारण्यात येत होते, तर वर्षभराचा काळ लोटल्यास 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतरही काही शुल्क आकारण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू दाखल्याच्या तपासणी चालू ठेवलेल्या प्रत्येक वर्षासाठी 20 रुपये आकारण्यात येतील.
जन्मापासून किंवा मृत्यूच्या दिवसानंतर 30 दिवसांनंतर ते एक वर्ष यादरम्यान जिल्हा निबंधक किंवा त्यांनी विहित केलेल्या अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीने 50 रुपये विलंब शुल्क भरून स्वयंप्रमाणित दस्तऐवज सादर केल्यावरच प्रमाणपत्र मिळेल.




























































