चाकरमान्यांसाठी खूशखबर! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5,220 ज्यादा बसेस धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान कोकणात एसटीच्या 5,220 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यंदा सुमारे 5,220 ज्यादा बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत. अधिकृत संकेतस्थळ, बस स्थानक आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे ज्यादा बसेसचे आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. 10 ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त 7 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेसचे संचालन करण्यात येणार आहे. कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.