नागपूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कोठडीत मारहाण, आयसीयूमध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपुरात 16 वर्षीय मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाला नाट्यमय वळण लागले आहे. आरोपी निर्मय माधव पाखरे याला छातीत तीव्र वेदना आणि शरीरावर अनेक जखमा झाल्याची तक्रार केल्यानंतर तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाखरेचे वकील अ‍ॅड. प्रकाश जैस्वाल याने पोलीस कोठडीत मारहाण झाल्यामुळे आपल्या अशीलाला दुखापत झाल्याचा दावा केला आहे.

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या आरोपीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोठडीत मारहाण झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. तपास भरकटवण्यासाठी आणि बचाव करण्यासाठी हा बनाव केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपी अत्यंत त्रासदायक आणि उद्दाम स्वभावाचा असून, त्याने तपासात सहकार्य करण्यास नकार दिला. तसेच पोलीस कोठडीत विशेष सुविधांची मागणी केली होती. मध्यरात्रीनंतर जमिनीवर आणि भिंतींवर डोके व चेहरा आपटू लागला आणि त्याने स्वतःलाच दुखापत करून घेतली, असा दावा पोलिसांनी केला आहे.

वैद्यकीय अहवालानुसार, या तरुणाच्या डोळ्याच्या हाडाला (ऑर्बिटल बोन) फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्याच्या हृदयाभोवतीच्या पेरिकार्डियल पोकळीत अतिरिक्त हवा असल्याचे आढळून आले आहे. अनिवार्य वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तसेच त्याच्या छातीच्या पोकळीतील हवेचे प्रमाण तपासण्यासाठी सीटी स्कॅन करण्यात आले.

कामोत्तेजना वाढवणाऱ्या औषधांचा अतिवापर केल्याने हृदयाच्या गंभीर समस्यांसह आरोग्याच्या विविध गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. लैंगिक क्रियेदरम्यान केलेल्या अतिश्रमपूर्ण हालचालींमुळेही हृदयाभोवती हवा साचण्याची (एअर सक्शन) प्रक्रिया घडू शकते, असे सरकारी रुग्णालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञाने सांगितले.

बीबीएचा विद्यार्थी असलेला निर्मय पाखरे हा ठाण्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा आणि एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा पुतण्या आहे. पीडित मुलगी एका उच्चपदस्थ महसूल अधिकाऱ्याची मुलगी आहे. हे दोघे गेल्या वर्षी मे महिन्यात इन्स्टाग्रामवर भेटले होते. पाखरे बनावट नावाने इन्स्टाग्रामवर सक्रिय होता.

16 वर्षीय मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि तिच्यावर वारंवार चाकूने वार केल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी मंगळवारी पहाटे पाखरेला अटक केली होती. दक्षिण नागपुरातील दिघोरी परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना पीडित मुलगी बांधलेल्या अवस्थेत आढळली. अपहरणकर्ता हातात बेल्ट घेऊन उभा होता आणि ज्या चाकूने मुलीवर वार करण्यात आले होते, तो चाकू पलंगाशेजारी पडलेला होता.