मरणानंतर मोक्षाची वाट बिकट; अंत्ययात्रा चिखलातून; अंत्यसंस्कार उघड्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईपासून जवळ असलेल्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात मरणानंतरही मोक्षाची वाट बिकट बनली आहे. मरकटवाडी या गावात स्मशानभूमीच नसल्याने एका वृद्धाच्या निधनानंतर त्याची अंत्ययात्रा चिखलातून काढावी लागली. एवढेच नव्हे तर अंत्यसंस्कारही उघड्यावर करावे लागले. विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारला साधी स्मशानभूमीदेखील आमच्या गावात बांधता का येत नाही, असा आर्त सवाल मरकटवाडीवासीयांनी केला आहे.

मोखाडा तालुक्याच्या पाथर्डी, बोटोशी ग्रामपंचायत हद्दीत मरकटवाडी ही २५३ लोकवस्तीची वाडी आहे. येथे राहणारे विठ्ठल वाघ (६१) यांचे बुधवारी निधन झाले. एकीकडे धो धो पाऊस आणि गावात कोणत्याही सुविधा नसल्यामुळे त्यांचा मृतदेह चिखल तुडवत नेण्यात आला. चिखलातूनच अंत्ययात्रा काढावी लागल्याने सरकारी यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे मरकटवाडीतील उघड्या जागेवरच वाघ यांच्या पार्थिवावर नातेवाईकांना अंत्यसंस्कार करावे लागले.

मोखाडा तालुक्यात महसुली गावांव्यतिरिक्त कोणत्याही खेड्यापाड्यांमध्ये सर्व सोयीसुविधांनी आवश्यक असलेली स्मशानभूमीच अद्यापि बांधलेली नाही. ज्या स्मशानभूमी आहेत त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागतात. विठ्ठल वाघ यांच्या नशिबीदेखील या यातना आल्या. स्थानिक प्रशासन तसेच सरकारी यंत्रणेने अतिदुर्गम भागातील स्मशानभूमीसारख्या सुविधांकडे लक्षच दिलेले नाही.

आणखी किती यातना भोगाव्या लागणार?
ग्रामपंचायतीने गेल्या अनेक वर्षांपासून गावपाड्यांत स्मशानभूमी बांधण्यासाठी पाठपुरावा केला आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मिळावा म्हणून अनेकदा ठराव दिले आहेत. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे आम्हाला मरणानंतर ही यातनाच भोगावा लागणार, असा संतप्त सवाल मरकटवाडीतील ग्रामस्थांनी केला आहे.