
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथील कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर स्विफ्टने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या स्विफ्टमधील चौघा युवकांना नागरिकांनी पाठलाग करून बडेवाडी टोलनाक्याजवळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
रत्ना सुनील राठोड (वय 35, रा. सेवानगर तांडा, तोंडोळी, ता. पाथर्डी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांचे पती सुनील उत्तम राठोड हे जखमी झाले आहेत.
रत्ना व सुनील राठोड हे दाम्पत्य दुचाकीवरून पाथर्डीकडे येत होते. यावेळी खरवंडी ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये पत्नी रत्ना राठोड यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी सुनील राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर स्विफ्ट कारमधील चार युवक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून बडेवाडी टोलनाक्याजवळ त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कारमधील चौघांपैकी दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. मयत महिलेच्या नातेवाईकांसह नागरिकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करत चारही तरुणांना ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे काहीकाळ पोलीस ठाण्यासमोर गोंधळ निर्माण झाला होता. स्विफ्ट गाडीत पाचजण असून, त्यातील एकजण पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.





























































