
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील पुलावर मोटारीने मोपेडला धडक दिल्यामुळे डॉ. खुशी पवन मुंदडा (वय 24, रा. नागपूर) या तरुणीचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक डॉ. योगेश संतोष लढ्ढा (वय 27, रा. सिव्हील हॉस्पिटल होस्टेल) हे जखमी झाले. मध्यरात्रीनंतर भूक लागल्यामुळे नाश्ता सेंटर शोधायला जाताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
डॉ. खुशी मुंदडा यांनी एमबीबीएस पूर्ण केले असून, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. सध्या त्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. बुधवारी मध्यरात्री डय़ुटी संपल्यानंतर डॉ. खुशी आणि डॉ. योगेश लढ्ढा हे दुचाकीवरून नाश्ता करण्यासाठी जात होते. विश्रामबाग चौकातून ते लक्ष्मी मंदिराकडे जाताना उड्डाणपुलावर मोटारीने दुचाकीला धडक दिली. यात डॉ. खुशी यांचा मृत्यू झाला.






























































