पळसदरीजवळ अपघात; भरधाव कारची स्कुटीला धडक, महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव कारची स्कुटीला धडक बसून एक महिला ठार आणि तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना कर्जत-खोपोली मार्गावर पळसदरी परिसरात आज घडली. जखमी तरुणाला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.

ताकई येथील मित्रांचा एक गट माथेरानकडे जात होता. पळसदरी येथील अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या रोहित वाघमारे या तरुणाच्या दुचाकीला वॅगनार कारची जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील त्याची अंबरनाथ येथील मैत्रीण ही गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडली तर रोहित गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कर्जत- खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट असून काही भागात रुंदी अचानक कमी होते. तसेच आवश्यक इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स व रस्ते चिन्हांचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांत मोबदला मिळाला नसल्याने रस्ता अर्धवट आहे. सध्या भूसंपादन विभागात हालचाली सुरू असल्या तरी राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांच्या वादात मोबदला रखडला आहे.

या मार्गावर आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून पळसदरी रस्ता आणखी किती बळी घेणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.