
एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला. पण शिंदे मराठ्यांशी बेइमान झाले, असा धक्कादायक आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. माझ्याच विरोधात त्यांच्या माणसांनी बैठका घेण्याचा सपाटा लावला. मी फडणवीसांचा तोरा उतरवला, शिंदेंची झाक उतरवायला मला काही वेळ लागणार नाही, असा इशारा देतानाच जरांगे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याचाही गौप्यस्फोट केला.
- एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा कलंक आम्ही मराठ्यांनी पुसला. माझ्याविरुद्ध बैठका घेऊन हीच उपकाराची परतफेड त्यांनी केली. शिंदेकडून मला अजिबात ही अपेक्षा नव्हती. मैत्री कराती तर ठासून आणि दुश्मनीही तशीच करावी.
- २१ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन मुंबईत करायचे, की आंतरवालीत याचा निर्णय लवकरच समाजाशी बोलून घेण्यात येणार आहे.
जात पडताळणी समितीने मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कड़क शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करणारे लोकच आता त्यांच्या कार्यालयात दिसतात, मराठ्यांना विरोध करणारे लोक तुमच्या कार्यालयात येतातच कसे? असा सवाल जरांगे यांनी केला.
संदिपान भुमरे आमच्यामुळेच निवडून आले
एकनाथ शिंदे यांची जी माणसे निवडून आली ती आमच्यामुळेच आली. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्यासाठी मराठा समाजाने जीवाचे रान केले. भुमरे हे सहाव्या क्रमांकावर होते, हे एवढ्या लवकर ते कसे काय विसरले? सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही बैठका घेतल्या. भुमरे, शिरसाट यांनी जे काही केले ते शिंदे यांच्या सांगण्यावरूनच ! शिंदे गटाच्या एका नेत्याच्या कॉलेजात मराठ्यांविरोधात बैठका घेण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही मनोज जरांगे यांनी केला. अतुल सावे यांनीही मागे असाच उद्योग केला होता, त्याबद्दल आमदार प्रसाद लाड यांच्याकडे तक्रार केली होती.
बावनकुळे यांनीच आदेश दिला
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. तात्पुरते प्रमाणपत्र द्या आणि पडताळणीत रद्द करा, असे बावनकुळे यांनी प्रशासनाला सांगितले असल्याचा स्पष्ट आरोप मनोज जरांगे यांनी केला. बावनकुळे यांची नार्को चाचणी करण्याची मागणीही जरांगे यांनी केली. माझ्या विरोधात कट-कारस्थाने करू नका, २०२९ मध्ये आयुष्यात बघितला नसेल असा बदला घेईन, बावनकुळेंनी मराठ्यांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजपचेही २५-३० आमदार पाडण्यात येतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या नादाला लागू नये, मी मागे लागलो तर अवघड होईल, असेही जरांगे म्हणाले.
नार्को चाचणी करायला माझी तयारी
जात पडताळणी समितीच्या कारभारात सरकार हस्तक्षेप करत नाही. जात पडताळणी समितीवर दवाव आणला जातो, या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ही अर्धन्यायिक यंत्रणा आहे. ज्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहे, त्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. मनोज जरांगे यांची मागणीच असेल तर नार्को चाचणी करायला माझी काही हरकत नसल्याचेही बावनकुळे म्हणाले.
जात पडताळणीच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नाही
मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यावरून केलेल्या आरोपांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केले. जात पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत काम करते. सरकार या समितीच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप करत नाही. कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळेच कुणबी प्रमाणपत्रे रद झाली आहेत, असे सांगून पडताळणी समिती म्हणजे सर्वकाही असे नाही. पडताळणी समितीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते, असेही फडणवीस म्हणाले.
उदय सामंतांची सारवासारव
मनोज जररांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल करताच मिंधे गटात भूकंपच आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगबगीने मनोज जरांगे यांना फोन करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दाखले कसे रद्द होतात हे मला पाहू द्या. कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींकडून सर्व कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. ती बघून पुढील धोरण ठरवू, असे सामंत यांनी जरगि यांना सांगितले.






























































