
अजित आगरकर यांना बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. कारण येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपत आहे, पण आगकर यांच्या जागी नवा चेहरा कोण, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी काही माजी खेळाडू शर्यतीत असले तरी प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी जुळवून घेणाऱ्या व्यक्तीचीच निवड केली जाईल, असे म्हटले जात आहे.
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
हिंदुस्थानी संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी बऱयाचदा काम पाहिले आहे. त्यामुळे संघातील सर्व खेळाडूंना ते चांगलेच ओळखतात. यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदीही त्यांची नियुक्ती केली गेली होती. त्यामुळे हिंदुस्थानातील सर्व खेळाडूंना ते चांगलेच ओळखतात. त्यामुळे त्यांचे नाव या पदासाठी चर्चेत आले आहे.
वीरेंद्र सेहवाग
हिंदुस्थानचा माजी धडाकेबाज सलामीवीर अशी ख्याती जगभरात असलेला वीरेंद्र सेहवाग या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. सेहवागकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा चांगलाच अनुभव आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेटमध्येही त्याचे लक्ष असते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेहवाग हा गंभीरच्या जवळची व्यक्ती आहे.
युवराज सिंग
भारताचा सिक्सर किंग म्हणून युवराज सिंगची ख्याती आहे. आपल्या शैलीदार फटकेबाजीने त्याने सर्वांची मनं जिंकली होती. आता संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असतो. युवराज स्वतः अष्टपैलू खेळाडू असल्याने तो या पदाला न्याय देईल, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर युवी गंभीरबरोबर खेळला असल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगला समन्वय असू शकतो.
रविचंद्रन अश्विन
रविचंद्रन अश्विनही निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे समोर येत आहे. गंभीरमुळेच अश्विनला भर ऑस्ट्रेलियाच्या दौऱयातून मायदेशी परतावे लागले होते. त्यामुळे बीसीसीआयला जर गंभीर यांना आपल्या मर्यादेत ठेवायचे असेल, त्यांना शह द्यायचा असेल तर अश्विनच्या नावाचा विचार बीसीसीआय करू शकते. कारण अश्विन गंभीर यांचे ऐकणार नाही, हे निश्चित.
रवी शास्त्री
रवी शास्त्री यांच्याही नावाची या पदाच्या निमित्ताने चर्चा होत आहे. रवी यांनी यापूर्वी संघासाठी संचालक आणि प्रशिक्षक ही दोन्ही पदं भूषवली आहेत. त्यामुळे त्यांना टीम इंडियामधील सर्व माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार यावेळी होऊ शकतो.


























































