
खड्डेमुक्त शहर करण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते तयार केले आहेत. मात्र या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अवघ्या काही महिन्यांतच रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे शिवसेनेने उघडकीस आणले आहे. अत्यंत हलगर्जीपणाने केलेल्या कामामुळे रस्त्यांची ही अवस्था झाली असल्याने याची चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
दादर परिसरातील डॉ. मोहन आगाशे पथ, काकासाहेब गाडगीळ मार्ग, खेड गल्ली, भवानी शंकर रोड यासह अनेक मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होऊन अवघे काही महिनेच झाले आहेत. मात्र एवढ्या कमी कालावधीतच रस्त्यांना भेगा पडणे, काँक्रीटचे थर उखडणे आणि रस्ते उंच-सखल, ओबडधोबड होणे असे गंभीर प्रकार समोर आले आहेत. शिवसेनेचे माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, ठेकेदारांनी आवश्यक तांत्रिक निकष व गुणवत्तेचे पालन न केल्यामुळेच ही दुरवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी रस्त्यांच्या कामांची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विचले यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
तांत्रिक चौकशीनंतर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून ठेकेदारांना तातडीने काळ्या यादीत टाकावे. तसेच दोषी ठेकेदाराच्या स्वखर्चाने रस्त्यांची पुन्हा योग्य दर्जाची दुरुस्ती करून घ्यावी, अशी स्पष्ट भूमिका विचले यांनी निवेदनाच्या माध्यमातून मांडली आहे.
























































