पुन्हा हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचा बिझनेस; महिलांच्या आशिया कपमध्येही टीआरपी फॉर्म्युला कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटच्या मैदानावर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांची लढत रंगली की टीव्हीचे टीआरपी मीटर वेगाने धावू लागतात, तिकिटांची विक्री विक्रमी होते, जाहिरातींचे दर गगनाला भिडतात आणि सोशल मीडियावर चर्चेचे वादळ घोंगावते. त्यामुळे आता कोणतीही मोठी स्पर्धा असो, आयसीसीची वर्ल्ड कप स्पर्धा असो किंवा आशियाई क्रिकेट परिषदेची (एसीसी) आशिया कप स्पर्धा, हिंदुस्थान-पाकिस्तान सामना हा जणू स्पर्धेचा अविभाज्य भागच बनवला जात आहे. त्यामुळे आगामी महिलांच्या आशिया कप टी-20 स्पर्धेतही हिंदुस्थान-पाकिस्तानचा बिझनेस खेळविला जाणार आहे.

आगामी महिला टी-20 आशिया कपचे वेळापत्रक जाहीर झाले असून, 5 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तान आमनेसामने उभे ठाकणार आहेत. 28 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. हिंदुस्थान, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांचा समावेश अ गटात, तर श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि मलेशिया हे ब गटात आहेत.

हिंदुस्थान आपल्या मोहिमेची सुरुवात 29 ऑगस्टला ओमानविरुद्ध करेल. त्यानंतर 31 ऑगस्टला संयुक्त अरब अमिराती, 5 सप्टेंबरला पाकिस्तान आणि 7 सप्टेंबरला गटातील अखेरचा सामना खेळेल. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, तर अंतिम सामना 13 सप्टेंबरला होईल.

या स्पर्धेतही योगायोगापेक्षा नियोजन अधिक असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. कारण गेल्या काही वर्षांत जवळपास प्रत्येक आयसीसी किंवा एसीसी स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवले जाते. त्यानंतर दोन्ही संघ बाद फेरीत पोहोचले, तर पुन्हा एक सामना. म्हणजे एका स्पर्धेत दोन, कधी तीन वेळा हेच द्वंद्व रंगवण्याची संधी आयोजक सोडत नाहीत. यामागचे गणितही उघड आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हणजे अब्जावधी प्रेक्षक, कोटय़वधी डॉलरचा जाहिरात महसूल आणि जगभरातील प्रसारण हक्कांचे वाढते मूल्य. त्यामुळे क्रिकेट हा केवळ खेळ राहिलेला नसून, या एका सामन्याभोवती फिरणारा मोठा व्यावसायिक उद्योग बनल्याची टीका सातत्याने होत आहे.