
मराठी भाषेच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मायबोली अध्ययन व संशोधन केंद्र आणि मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर (अमरावती) यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अविनाश आवलगावकर आणि मायबोली अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. विनोद कुमरे यांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झाला. या कराराअंतर्गत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, लोकपरंपरा आणि विविध बोलीभाषांच्या अध्ययन व संशोधनाला चालना मिळणार आहे. कराराच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक भाषा प्रक्रिया, भाषा तंत्रज्ञान, डिजिटल भाषा संसाधने आणि संगणकीय भाषाविज्ञान या आधुनिक क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि तांत्रिक उपक्रम राबविले जाणार आहेत.


























































