भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांना हायकोर्टाकडून जामीन, 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांचा मुंबई उच्च न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने पुरोहित यांची सुटका करण्याचे आदेश दिले.

कोरोनाकाळात भाजपने बेस्टविरोधात आंदोलन केले होते. इतकेच नव्हे, तर बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेरण्याचा प्रयत्नदेखील केला होता. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह माजी आमदार अतुल शहा, भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित, नगरसेविका शीतल गंभीर व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यावर बुधवारी विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांना १९ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली; इतकेच नव्हे तर त्यांचा जामीन अर्जही फेटाळला. याविरोधात आकाश पुरोहित यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सुटका करण्याची मागणी केली. या याचिकेवर आज, गुरुवारी श्याम चांडक यांच्यासमोर सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या पी.आर. बाँडवर त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला.