
एनआयएचा अधिकारी असल्याची ओळख सांगत एका भामट्याने ७५ वर्षीय वृद्धाला डिजिटल अटक केली. मग त्यांच्या मुलांवरही गुन्हा दाखल होईल अशी भीती दाखवत वृद्धाकडून ३१ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन उकळले. ही रक्कम ज्या बोगस बँक खात्यावर घेण्यात आली त्या खातेदाराला सायबर पोलिसांनी सोलापूर येथे पकडले.
शिरीष आस्तिक हे दक्षिण मुंबईत राहतात. १५ ते २७ जुलैदरम्यान आस्तिक यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. तो एनआयए अधिकारी असून ‘प्रदीप जयस्वाल’ असे नाव त्याने सांगितले. आस्तिक यांना, “तुमचे नाव व आधार कार्ड वापरून खोटे सिम कार्ड बनवण्यात आले आहे, या कार्डच्या आधारे कॅनरा बँकेत खाते उघडून त्यामधून मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग झालेले आहे. तसेच तुम्ही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहात. तुमच्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,” असे सांगून तुमच्या मुलाच्या नावाने गुन्हा दाखल करणार अशी भीती दाखवली. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी त्याने आस्तिक यांच्याकडून बँक खात्यांवर ३१ लाख ५० हजार रुपये टाकण्यास भाग पाडून फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खरोटे व त्यांच्या पथकाने तपास केला.



























































