
बेस्ट उपक्रमाच्या मजास आगारात अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन कामगार जखमी झाले. गुरुवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात एका कामगाराच्या पायाला व चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन खूप रक्तस्त्राव झाला. तिघांना तातडीने जोगेश्वरी पूर्वेकडील पालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात हलवण्यात आले. आगारातील वाहतूक आणि अभियांत्रिकी विभागाच्या दोन्ही इमारती धोकादायक स्थितीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बेस्टच्या शहरातील 27 आगारांपैकी बहुतांश आगारांची दुरवस्था झाली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मजास आगारातील इमारती अत्यंत धोकादायक स्थितीत गेल्या आहेत. यातूनच गुरुवारी सकाळी मजास आगारातील मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या ऑपरेटर्सच्या स्टोअर रूम-कम-विश्रांती कक्षाचा स्लॅब कोसळला. प्लास्टरचे मोठमोठे तुकडे कामगारांच्या अंगावर पडले. यामध्ये अभियांत्रिकी विभागातील तीन मेकॅनिक जखमी झाले. रियान शेख, सलमान खान आणि मुजमदिन खान अशी जखमी कामगारांची नावे आहेत.
कर्मचारी-अधिकाऱ्यांचे जीव मुठीत धरून काम
मजास आगारातील इमारतींच्या भिंतींना ठिकठिकाणी मोठमोठे तडे गेले असून अनेक भागांमध्ये छताचे स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. इमारत विभागाकडून जुजबी डागडुजी केली जात आहे. त्यावर मोठा खर्च केला जातो. असे असूनही आमची सुरक्षा रामभरोसे असल्याची प्रतिक्रिया आगारातील काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
इमारत डागडुजीबाबत अधिकारीच संभ्रमात
धोकादायक इमारतीच्या डागडुजीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून संभ्रमाची उत्तरे मिळाली. एकीकडे कर्मचाऱ्यांनी इमारतीमध्ये डागडुजीचा दिखावा करून मोठा खर्च केला जात असल्याचे म्हणणे मांडले. मात्र इमारत विभागातील ज्युनियर अभियंता अनिल यमगर यांनी चालू आर्थिक वर्षात दुरुस्तीवर काहीच खर्च केला नसल्याचे उत्तर दिले.




























































