म्हाडाच्या मुंबईतील 2,640 घरांची संगणकीय सोडत आज वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. सुमारे 75 हजार अर्जदारांमधून भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली. स्क्रीनवर नाव झळकताच विजेत्यांना आनंदाश्रू अनावर झाले. काहींनी तत्काळ आपल्या नातेवाईकांना फोन करून ही आनंदवार्ता दिली, तर काहींनी एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष साजरा केला. वर्षानुवर्षे मुंबईत स्वतःच्या घरासाठी वाट पाहणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला.
म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या या सोडतीत विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर, वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2,640 घरांचा समावेश होता. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 856, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 841 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आज रंगशारदा सभागृहात सोडत पार पडली. यावेळी मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, महापौर रितू तावडे, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते. सोडतीत नाव जाहीर होताच विजेत्यांनी देवाचे आभार मानले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हक्काच्या घराची किल्ली मिळण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याची भावना विजेत्यांनी व्यक्त केली.
गेली आठ वर्षे मी नियमितपणे म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरत होतो; मात्र प्रत्येक वेळी पदरी निराशाच पडत होती. यंदा चार घरांसाठी अर्ज केले होते आणि आश्चर्य म्हणजे चारही ठिकाणी विजेता ठरलो आहे. नशिबाने यावेळी अक्षरशः चौकारच मारला आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. – शिवराज पाटील, विजेता
मी आयुष्यात पहिल्यांदाच म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता. पहिल्याच प्रयत्नात वडाळा येथील घर लागले आहे. निकालात माझे नाव पाहताच क्षणभर विश्वासच बसला नाही. स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल, असे कधी वाटले नव्हते. – प्रियांका सावर्डेकर, विजेती