
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘टीम इंडिया’च्या खेळाडूंसाठी फिटनेसचे निकष आणखी कठोर केले आहेत. आता केवळ कौशल्य पुरेसे ठरणार नसून संघात स्थान टिकवण्यासाठी खेळाडूंना अधिक अवघड फिटनेस चाचण्या उत्तीर्ण कराव्या लागणार आहेत.
नव्या नियमानुसार ब्रॉन्को टेस्ट पूर्वीच्या सहा मिनिटांऐवजी 5 मिनिटे 20 सेपंदांत पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर कोणताही विश्रांतीचा अवधी न देता लगेच दोन किलोमीटर धावण्याची चाचणी घेतली जाणार असून ती 9 ते 10 मिनिटांत पूर्ण करणे अनिवार्य असेल. यापूर्वी या दोन्ही चाचण्या स्वतंत्रपणे घेतल्या जात होत्या. ब्रॉन्को टेस्टमध्ये 20, 40 आणि 60 मीटरचे पाच सलग फेरे धावावे लागतात. एकूण 1,200 मीटरचे हे अंतर कोणत्याही विश्रांतीशिवाय पूर्ण करावे लागते. आता वेळेची मर्यादा कमी झाल्याने ही परीक्षा अधिक कठीण बनली आहे.
फिटनेस निकषांवर प्रश्नचिन्ह
‘बीसीसीआय’च्या सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात फिटनेस चाचण्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली नव्हती. काही वरिष्ठ खेळाडूंना तुलनेने सुलभ निकष लागू करण्यात आले होते. तसेच टीम व्यवस्थापनाच्या आग्रहावरून पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांना फिटनेस क्लिअरन्स देण्यात आल्याचे समोर आले आहे. इंग्लंड दौऱयात अतिरिक्त वजनामुळे हर्षित राणाला संघातून परत पाठवण्यात आले होते. त्यावेळी त्याचे वजन 97 किलो होते. आता त्याच्यासाठी 96 किलोपेक्षा कमी वजनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून सध्या त्याचे वजन 94 किलो असल्याची माहिती आहे.
फिजिओकडून खुलासा मागवला
खेळाडू वारंवार दुखापतग्रस्त होणे आणि इंग्लंडमधील अनुकूल वातावरणातही स्नायूंना गोळे येण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर सचिव देवजित सैकिया आणि टीम व्यवस्थापनाने संघाचे फिजिओ कमलेश जैन यांच्याकडून खुलासा मागवला आहे. कोणत्याही खेळाडूचा दर्जा किंवा स्टारडम न पाहता फिटनेस कमी वाटल्यास तातडीने माहिती देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक खेळाडूंची मैदानावरील हालचाल मंदावल्याचे आणि दीर्घकाळ फलंदाजी करताना पळून धावा काढण्यात अडचणी येत असल्याचे व्यवस्थापनाचे निरीक्षण आहे.
बुमरा अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही
सेंटर ऑफ एक्सलन्स आणि टीम व्यवस्थापनातील समन्वयाच्या अभावामुळे जसप्रीत बुमरा श्रीलंकेविरुद्धच्या 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलेला नाही. तसेच पेंद्रीय करारातील अनेक खेळाडूंनाही नव्या फिटनेस निकषांची माहिती उशिरा मिळाल्याचे समोर आले आहे.
अतिरिक्त ट्रेनिंगचा धोकाही वाढला
2023च्या एकदिवसीय विश्वचषक, 2024च्या टी-20 विश्वचषक आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान हिंदुस्थानी संघाचे दुखापत व्यवस्थापन प्रभावी मानले जात होते. मात्र आता खेळाडूंना वारंवार यो-यो, ब्रॉन्को आणि दोन किलोमीटर धावण्याच्या चाचण्या द्याव्या लागत असल्याने तज्ञांनी अतिप्रशिक्षणामुळे थकवा वाढून दुखापतींचा धोका वाढू शकतो, असा इशारा दिला आहे.
























































