
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी हिंदुस्थानचा संघ तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना हिंदुस्थानी संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेता येईल. हा सराव सामना शुक्रवारी सुरू होणार आहे. या सामन्याच्या खेळपट्टीवर हिंदुस्थान संघ व्यवस्थापन नाराज आहे. या सराव सामन्यासाठी हिंदुस्थानी संघाला वेगवान गोलंदाजीला मदत करणारी खेळपट्टी दिली आहे.
क्युरेटरचे काय म्हणणे आहे...
याबाबत हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाने खेळपट्टीच्या क्युरेटरशी संपर्क साधला आणि त्याला याबाबत विचारणा केली. त्यावर क्युरेटर म्हणाला की, खेळपट्टी ही स्पार्ंटग आहे, असे मला वाटते. या खेळपट्टीवर गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही मदत मिळू शकते. त्यामुळे या खेळपट्टीवर चांगला खेळ पाहायला मिळेल, अशी मला आशा आहे. हिंदुस्थान संघाने सांगितले की खेळपट्टीवर खूप गवत आहे. पण आम्ही ती तशीच ठेवली कारण हा तीन दिवसांचा सामना आहे. तुम्ही गवतविरहित खेळपट्टी देऊ शकत नाही. श्रीलंका क्रिकेटने सामन्यासाठी काही गवताची विनंती केली आहे. त्यामुळे आम्ही ती तशीच ठेवू. नंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो. एनसीसीची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी चांगली असते. आम्हाला येथे मोठय़ा धावसंख्येची अपेक्षा आहे. गॉलला जाण्यापूर्वी भारतीय फलंदाज येथे चांगला सराव करू शकतात.
हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन का आहे नाराज…
क्युरेटरने सराव सामन्यासाठी खेळपट्टीवर गवत तसेच ठेवले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. पण श्रीलंकेबरोबरचा जेव्हा कसोटी सामना खेळवला जाईल त्यावेळी फिरकीला पोषक खेळपट्टी बनवली जाईल. त्यामुळे हिंदुस्थानच्या खेळाडूंना वेगवान खेळपट्टीवर सराव करायला लावायचा आणि प्रत्यक्षात कसोटी सामना खेळताना त्यांच्यासमोर आखाडा खेळपट्टी आणायची, हा श्रीलंकेचा कसोटी मालिकेपूर्वी मोठा डाव असल्याचे आता म्हटले जात आहे. त्यामुळेच हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन यावर नाराज असल्याचे समोर येत आहे.
























































