
विक्रोळी पश्चिम येथील राहुल नगर परिसरात आज पहाटे थरारक घटना घडली. मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात झाले. दोघा सख्ख्या भावांनी मिळून मोठा भाऊ व पुतण्याला कायमचे संपवले. सुनील विश्वकर्मा (40) आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर येथे पहाटेच्या सुमारास घडली. मोठ्या आवाजात गाणी लावण्यास आक्षेप घेत सुरेंद्र आणि सूरज विश्वकर्मा या दोघांसह सुरेंद्रची पत्नी प्रीती यांनी दोन नंबरचा भाऊ सुनील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींचा पारा इतका चढला होता की त्यांनी धारदार चाकूने सुनीलसह पत्नी अंजू, मुलं श्लोक आणि विवान यांच्यावर वार केले. हा प्रकार समोर आल्यानंतर चौघांनाही तातडीने राजावाडी इस्पितळात नेण्यात आले. मात्र सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा मुलगा श्लोक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंजू आणि विवानवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सुरज आणि सुरेंद्र या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
सुनील हा दोन क्रमांकाचा तर सुरज आणि सुरेंद्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा भाऊ होता. आरोपी व मृतकामध्ये कौटुंबिक वाद होता. हे सर्व एकत्र राहावयास होते. आज पहाटे प्रीती आंघोळीला गेली असता मोठ्या आवाजात गाणी का लावली या कारणावरून वाद झाला आणि हत्याकांड घडले.



























































