
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने शनिवार, 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये गणेशोत्सव संबंधित सर्व यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे सर्व मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वय समितीकडून करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील नाबर गुरुजी असेम्ब्ली हॉल (राजा शिवछत्रपती शाळा), गेट नं. 15, हिंदू कॉलनी येथे सायंकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत या वर्षी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात पालिका, पोलीस विभाग, वाहतूक विभाग, पर्यावरण विभाग, अग्निशमन दल आदीबाबत येणाऱ्या अडचणी, तक्रारी व संबंधित विभागांकडे करावयाच्या मागण्यांबाबत विचारविनिमय करण्यात येईल. त्यामुळे मंडळांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन समन्वय समितीचे प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, कार्याध्यक्ष पुंदन आगसकर यांनी केले आहे.





























































