
मुंबई महापालिकेने महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपात दोषी आढळलेला प्रशासकीय अधिकारी इरफान पठाण याची सेवा समाप्त केली आहे. ही कारवाई कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध (पॉश) कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पालिकेच्या तक्रार समितीच्या चौकशी अहवालानंतर करण्यात आली आहे.
तक्रारदार महिलेने इरफान पठाण याच्यावर कार्यालयात गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. महिलेला तिच्या वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर पालिकेत नोकरी देण्यात आली होती. महापौर रितू तावडे यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून इरफान पठाणला तत्काळ निलंबित करून आरोपांची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर अंतर्गत तक्रार समितीने प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत इरफान पठाण दोषी आढळला. त्यानंतर समितीने त्याची सेवा समाप्त करण्याची शिफारस केली आणि त्यानुसार प्रशासनाने सेवा नियमांनुसार कारवाई केली.
पालिकेने याच आठवड्य़ात इरफान पठाणची सेवा समाप्त करण्याचा आदेश जारी केला. या निर्णयाविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र न्यायालयाने पालिकेच्या आदेशाला कोणतीही अंतरिम स्थगिती दिली नाही.





























































