
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या मागील तटबंदीच्या भिंतीवर कोरलेला एक महत्त्वपूर्ण शिलालेख प्रकाशित आला असून, हा शिलालेख शके १८३३ (इ.स. १९११) मधील असल्याचे सांगितले जात आहे. हा लालेख तत्कालीन देवस्थानाचे आर्थिक नियोजन, मंदिर व्यवस्थापन आणि माजिक सहभागाचा दुर्मिळ ऐतिहासिक पुरावा ठरत आहे. मराठी देवनागरी लिपीतील हा आठ ओळींचा शिलालेख मंदिराच्या मागील तटबंदीच्या बाहेरील भंतीवर कोरलेला आहे. अनेक वर्षे ऊन, बरा, पाऊस आणि रंगरंगोटीचा परिणाम झाल्याने काही अक्षरे अस्पष्ट झाली असली, तरी त्याचे वाचन यशस्वीरीत्या करण्यात आले आहे.
शिलालेखाच्या सुरुवातीला ‘श्री गोपाळकृष्ण प्रसन्न’ अशा मंगलाचरणाचा उल्लेख असून, त्याच्यात मंदिराच्या पाठीमागील तटबंदीच्या बांधकामाची माहिती दिली आहे. श्री जनाबाई यांच्या नावाने मिळणाऱ्या निधीतून तसेच देवस्थानाच्या उत्पन्नातून प्रथम नियमित खर्च भागविण्यात आला. त्यानंतर उर्वरित निधीतून तटबंदीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, अशी स्पष्ट नोंद या लेखात आहे.
विशेष म्हणजे हे कार्य समस्त गुरव समाजाने पूर्ण केले असून, त्यासाठी २५०० रुपये खर्च झाल्याची नोंदही कोरण्यात आली आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते हा शिलालेख केवळ मंदिराच्या बांधकामाची नोंद नसून, तत्कालीन देवस्थानांची आर्थिक शिस्त, निधी नियोजन आणि धार्मिक संस्थांच्या संघटित व्यवस्थापनाची साक्ष देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. श्री जनाबाई यांच्या उल्लेखामुळे त्या व्यक्तीचे मंदिराशी असलेले संबंध, दानपरंपरा आणि स्थानिक धार्मिक इतिहासाचा पुढील अभ्यास करण्यास नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुराभिलेखशास्त्र, स्थानिक इतिहास आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा असून, भविष्यातील संशोधनासाठी तो विश्वासार्ह ऐतिहासिक स्रोत मानला जात आहे. या शिलालेखाचे संशोधक रवि शिवाजी मोरे आहेत, तर शिलालेख वाचन अनिल दुधाणे व कृष्णा गुडदे यांनी केले आहे. या कामासाठी अविनाश डोवे-पाटील यांचे सहकार्य लाभले.





























































