बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेटूक! भूत येते अन् अनुदान घेऊन जाते ! दहा वर्षांपासून अधिकाऱ्यांची मेहेरबानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक भ्रष्टाचार, नोकर भरतीसाठी कुख्यातच आहे. पण आता बँकेत चक्क ५१ वर्षांपूर्वी मृत झालेली व्यक्ती दहा वर्षांपासून शासकीय अनुदान घेण्यासाठी येत असल्याचा भीतीदायक प्रकार उजेडात आला आहे. शासकीय अनुदान आले की अधिकाऱ्यांच्या मदतीने हा मयत भूतलावर येतो आणि अनुदान घेऊन परत स्वर्गस्थ होतो ! अनुदानासाठी भूतलावर येणे आणि पुन्हा स्वर्गस्थ होण्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मयताच्या पुतण्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मोरवड येथील मल्हारी कानू लंबाटे यांची गट क्रमांक १७७, १८१, १८२ आणि २१५ मध्ये शेत जमीन आहे. त्यांना अंबादास, आश्रोबा, काशिनाथ, विश्वनाथ, ज्ञानोबा तसेच मारुती ही सहा मुले आणि चार मुली आहेत. त्यापैकी मारुती याचा वयाच्या पंधराव्या वर्षी १९७५ मध्ये विहिरीत बुडून मृत्यू झाला. मल्हारी लंबाटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हयात असलेल्या पाच मुलांनी जमिनीची वाटणी करून घेतली. त्यावेळी वारसदारांच्या नावात मारुती याचा उल्लेखही नव्हता.

२०१६ मध्ये तलाठी दिलीप भडके आणि मंडळ अधिकारी जगन्नाथ सानप यांनी सातबारावर मयत मारुती याची नोंद घेतली आहे. तक्रारदार संतोष लंबाटे यांच्या म्हणण्याप्रमाणे मारुतीचा मृत्यू १९७५ म्हणजे जवळपास ५१ वर्षांपूर्वी झाला आहे. त्याच्या जन्म, मृत्यूची नोंद ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नाही. त्याची समाधी शेतामध्ये अजूनही अस्तित्वात आहे, असे असतानाही मारुतीच्या नावे फेर करण्यात आला.

वडवणी बँकेतील खात्यावर अनुदान जमा

मारुतीच्या नावावर फेर करण्यात आला, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडवणी शाखेत मारुतीच्या नावाने खातेही उघडण्यात आले. खाते क्रमांक २०१२१६५ वरून मारुती लंबाटे याने दहा वर्षांपासून शासकीय अनुदानाचा लाभ घेतल्याचे कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट होत आहे. मयताच्या नावाने होत असलेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.