‘धवललक्ष्मी’ नॉट रिचेबल, २२८ दिवस, ४,७८५ किमी प्रवास; डहाणूतील कासवाच्या सॅटेलाइट ट्रान्समीटरमध्ये बिघाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डहाणू येथील कासव उपचार केंद्रात उपचार व पुनर्वसन करण्यात आलेल्या ‘धवललक्ष्मी’ या ऑलिव्ह रिडले सागरी कासवाने तब्बल २२८ दिवसांत ४,७८५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. यानंतर मात्र ‘धवललक्ष्मी’ नॉट रिचेबल आहे. कासवाच्या हालचाली आणि वर्तनात कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसल्याने ट्रान्समीटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘धवललक्ष्मी’ हे कासव सुरुवातीला समुद्रातील मासेमारीच्या जाळ्यात अडकले होते. त्याची सुटका करून डहाणू येथील कासव उपचार केंद्रात उपचार व पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनानंतर नैसर्गिक अधिवासात त्याच्या जगण्याचे आणि स्थलांतराच्या प्रवासाचे निरीक्षण करण्यासाठी त्याच्या पाठीवर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रात सोडण्यात आले. समुद्रात सोडल्यानंतर ‘धवललक्ष्मी’ने अरबी समुद्रात मोठा प्रवास करत पश्चिमेकडे ओमानच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यानंतर ते पुन्हा हिंदुस्थानी सागरी हद्दीत परतले.

५ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अंतिम सिग्नलनुसार हे कासव कर्नाटकातील मुर्देश्वर किनाऱ्यापासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर होते. शेवटच्या काही दिवसांतील डायव्ह (पाण्यातील हालचाल) डेटाचे विश्लेषण केल्यानंतर कासवाच्या वर्तनात कोणतीही असामान्यता आढळून आली नाही. त्यामुळे सॅटेलाइट टॅगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संदेश मिळणे बंद झाल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित
‘धवललक्ष्मी’ने केलेल्या ४,७८५ किलोमीटरचा यशस्वी प्रवास पाहता पुनर्वसन केलेली सागरी कासवे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात यशस्वीपणे जीवन जगू शकतात, याचा ठोस पुरावा मानला जात आहे. त्यामुळे सागरी कासवांच्या बचाव, उपचार आणि पुनर्वसन उपक्रमांचे पर्यावरणीय महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.