
जिह्यात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करणाऱयांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत पारनेर आणि अहिल्यानगर शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवर छापे टाकले. या कारवाईत कत्तलीसाठी डांबून ठेवलेली 62 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच दोन ठिकाणांहून 160 किलो गोमांस, कत्तलीची हत्यारे आणि वजनकाटे जप्त करण्यात आले. या तीनही कारवायांमध्ये पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलतान आयनूर मदारी आणि चिराग मदारी (दोघे रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) अशी गुन्हा झालेल्यांची नावे आहेत. दोघेही फरार आहेत.
अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरातील एका बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी 100 किलो गोमांस, दोन सत्तूर, दोन सुरे आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा सुमारे 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेख मोहम्मद आवेझ (वय 35) याला अटक करण्यात आली असून, बाबू कुरेशी हा आरोपी फरार आहे.
भिंगार कॅम्प ठाण्याच्या हद्दीतील सदरबाजार परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 60 किलो गोमांसासह 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आदिल अमीन कुरेशी (वय 23) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संयुक्त कारवाईत पोलिसांनी 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण पाच आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, सागर ससाणे, विशाल तनपुरे, प्रकाश मांडगे, संदीप पवार, सुनील पवार, अरविंद भिंगारदिवे आणि गणेश धोत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पारनेरमध्ये 62 जनावरांची सुटका
पारनेर तालुक्यातील एका ठिकाणी कत्तलीसाठी डांबून ठेवलेली 62 लहान गोवंशीय जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची सुटका केली. या जनावरांची किंमत सुमारे 3 लाख 10 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.




























































