
कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी (पाचोरे वस्ती) येथे बुधवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत शेततळ्याने दोन तरुणांचा बळी घेतला. खरीप पिकांवर फवारणी करत असताना पंपात पाणी भरण्यासाठी गेलेल्या दीपक रामचंद्र पाचोरे (वय 33) आणि प्रशांत गीताराम पाचोरे (वय 34) या दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
फवारणी पंपातील पाणी संपल्याने दोघेही शेततळ्यावर गेले होते. यावेळी एकाचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱयाने धाव घेतली. मात्र, त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बराच वेळ होऊनही प्रशांत पाचोरे घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने शोधाशोध सुरू केली. त्यानंतरही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच, शिर्डी साई संस्थान व कोपरगाव नगरपरिषदेचे अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
एका तरुणाला तातडीने शिर्डी येथील साई संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याला मृत घोषित केले. दुसरा तरुण शेततळ्यात सापडत नसल्याने जेसीबीच्या साहाय्याने शेततळ्याचा काही भाग फोडून शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर त्याचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
शेततळी की मृत्यूचा सापळा?
शेतीसाठी जीवनदायी ठरणारी शेततळी सुरक्षेअभावी अनेकदा मृत्यूचा सापळा बनत आहेत. कठडे, इशारा फलक, दोरी, लाइफ बॉय यांसारख्या मूलभूत सुरक्षाव्यवस्थेचा अभाव असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. प्रशासनाने याबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




























































