
नेहमीप्रमाणे मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे कर्मचारी सिद्धेश्वर बाबर हे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहतूक नियोजनासाठी कार्यरत होते. दरम्यान, नेहा शिंदे ही पाच वर्षांची मुलगी घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या स्थितीत एकटीच फिरताना पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर बाबर यांच्या निदर्शनास आली.
ही मुलगी हरवलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले पण तिचे वय लहान असल्याने ती स्वतःचे नाव आणि पत्ता नीट सांगू शकत नव्हती. बाबर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिला चौकीत आणले. तिला खाऊ देऊन तिची आपुलकीने विचारपूस केली.
आता तिच्या पालकांचा शोध घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. यासाठी बाबर यांनी सोशल मीडियाचा आधार घेण्याचे ठरवले. त्यांनी नेहाचा फोटो काढून आपल्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज लिहिला आणि स्टेटस ठेवले. हे स्टेटस मोहोळ शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांनी, पत्रकारांनी आणि स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर शेअर केले. काही वेळातच हे स्टेटस नेहाच्या नातेवाईकांपर्यंतही पोहोचले. हरवलेल्या नेहाचा फोटो पोलिसांच्या स्टेटसवर पाहून आई सुमन यांच्या जीवात जीव आला. त्यांनी तत्काळ पोलीस चौकी गाठली.
पोलीस निरीक्षक पाटील यांच्या उपस्थितीत कागदोपत्री खात्री करून नेहाला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलीला सुखरूप पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
कर्तव्यभावनेसह माध्यमांचा सकारात्मक वापर
कर्तव्यभावनेबरोबरच अत्याधुनिक माध्यमांचा सकारात्मक वापर करून दाखवलेल्या या समयसूचकतेबद्दल पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर बाबर आणि वाहतूक शाखेच्या टीमचे संपूर्ण मोहोळ शहर व तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे.




























































