
एलपीजी गॅस सिलिंडर बुक करणाऱया ग्राहकांना 16 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जर ग्राहकाने 16 ऑगस्टपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर ग्राहकांना गॅस रिफिल बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व घरगुती गॅस कनेक्शनधारकांनी ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन गॅस कंपन्यांनी केले आहे.
देशभरातील उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱया लाभार्थ्यांना सबसिडी मिळण्यास अडचणी येऊ शकतात, तर काही प्रकरणांमध्ये घरगुती दराऐवजी व्यावसायिक दराने सिलिंडर घ्यावा लागू शकतो. गॅस कंपन्यांच्या मते, ई-केवायसीचा उद्देश प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणे, तसेच बनावट किंवा अनधिकृत कनेक्शन रोखणे आणि सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. अनेक भागांमध्ये अजूनही मोठय़ा संख्येने ग्राहकांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे गॅस एजन्सीकडून फोन कॉल, एसएमएस तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून ग्राहकांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ग्राहकांना रिफिल बुकिंग तात्पुरते बंद होण्याबाबतचे संदेशही मिळू लागल्याची माहिती आहे.
– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा सध्या 10 कोटी लाभार्थी लाभ घेत आहेत. यात त्यांना वर्षाला चार सिलिंडरवर प्रति सिलिंडर 300 रुपये डीबीटीद्वारे खात्यात जमा केले जातात. याआधी वर्षाला नऊ सिलिंडर मिळत होते. मात्र जून महिन्यात यात बदल करण्यात आला. त्यामुळे आता जर ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर याचा लाभ घेणाऱयांना सबसिडी मिळण्यास अडचणी येऊ शकतात.




























































