
अभिनेता राजपाल यादवने बँकेकडून घेतलेले 16.61 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे आता त्याच्या उत्तर प्रदेशातील घर आणि शेतजमिनीचा येत्या 9 सप्टेंबरला लिलाव होणार आहे. ठरलेल्या मुदतीत जर राजपालने थकबाकी भरली नाही, तर या दोन्ही मालमत्ता नव्या खरेदीदारांना विकल्या जाणार आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने राजपाल यादवच्या दोन मालमत्तांवर जप्तीची नोटीस लावली आहे. राजपालने ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 16 कोटी 61 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्याने उत्तर प्रदेशातील काही मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या होत्या, परंतु सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने त्याला मोठा आर्थिक फटका बसल्याने त्याने कर्जाची रक्कम परतफेड केली नाही.
राजपालच्या शाहजहांपूर जिह्यातील एक निवासी घर आणि एक शेतीची जमीन याचा बँकेकडून लिलाव होणार आहे. ही मालमत्ता 3.99 कोटी रुपयांची असल्याची माहिती आहे. बँकेने जारी केलेल्या नोटिसीनुसार, 9 सप्टेंबर रोजी हा लिलाव ऑनलाइन होणार आहे.




























































