जम्मू-कश्मीरमधील ‘टार्गेट किलिंग’चा सूत्रधार लतीफ भट पोलिसांच्या रडारवर, 15 लाखांचे रोख बक्षीस जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच असून टार्गेट किलिंगमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्यांमध्ये लश्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट याचा हात असल्याचा संशय जम्मू-कश्मीर पोलिसांना आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोहमोहीम तीव्र केली असून त्याच्यावर 15 लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले आहे. भटचा ठावठिकाणा देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे. लतीफ भटला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी दक्षिण कश्मीरातील जिल्ह्यंमध्ये आणि जम्मूतील अनेक भागांमध्ये त्याचे वॉन्टेड पोस्टर्स लावले आहेत. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

शोपियान येथे झालेल्या चकमकीनंतर लतीफ भट हा चर्चेत आला होता. चकमकीदरम्यान तो एलटीएचा टॉपचा कमांडर झाकीर गणईसोबत वेढला गेला होता. पाच दिवस चाललेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी झाकीरला कंठस्नान घातले, मात्र लतीफ भट तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. आता तो सीमापार बसलेल्या आकांच्या सांगण्यावरून टार्गेट किलिंग करत असून सुरक्षा दलावरही हल्ले करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

गेल्या महिन्यात अनंतनाग येथे एका पोलिसाची हत्या झाली होती. या हत्येमागे लतीफ भट याचा हात असून तोच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर कश्मीर खोऱ्यात पोलिसांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच गेल्या आठवड्यात कुलगाम येथे छत्तीसगडच्या दोन मजुरांची धर्म विचारून हत्या झाली होती, त्यातही भटचा हात असल्याचा संशय आहे.

शहा पुण्यात, कश्मीरात दहशतवादी हल्ला, धर्म विचारून गोळ्या घातल्या; 2 हिंदू मजुरांचा मृत्यू

प्राथमिक तपासानुसार, या दोन्ही हल्ल्यांमध्ये एके-47 ऐवजी पिस्तूलसारख्या छोट्या शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. ही कार्यपद्धती हायब्रिड दहशतवाद्यांची अर्थात स्थानिक पातळीवर भरती केलेले आणि हल्ला करून नागरिकांमध्ये मिसळणारे दहशतवादी यांची असल्याचे स्पष्ट होते. हे हल्ले एलटीएची उपशाखा असलेल्या टीआरआफच्या कार्यपद्धतीशी जुळणारे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात कडक नाकेबंदी केली असून लतीफ भटचा शोध सुरू आहे.

सामना अग्रलेख – कश्मीरात दहशतवादी हल्ला; नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या!